मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा अकराशेपार गेला आहे. तर नांदेड, रत्नागिरीत रुग्णसंख्येची शंभरी पार गेली असून उस्मानाबादची रेड झोनच्या दिशेने वाटचाल झाली आहे. तर मालेगावरमध्ये कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पुण्यातही ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
BreakingNews । महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा अकराशेपार, नांदेड, रत्नागिरीत रुग्णसंख्येची शंभरी पार तर उस्मानाबादची रेड झोनच्या दिशेने वाटचाल #Lockdown #COVID19
#CoronaVirus @ashish_jadhao— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 20, 2020
नांदेडमध्ये कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण आढळलेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरचा आकडा पार केला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण १०६ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार झालाय. जिल्ह्यात आणखी 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ८२ पैकी १६ अहवाल पॉझिटीव्ह आलेत तर ६६अहवाल निगेटिव्ह आलेत. रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागरमध्ये नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. नव्याने आढळलेले रुग्ण मुंबईहून कोकणात दाखल झालेले आहेत. सध्या रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा १०८ वर पोहोचला आहे.
पुणे जिल्ह्यात आज आणखी कोरोनाचे ३२ रुग्ण आढळले त्यामुळे पुण्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ४०२ इतकी झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल होत आहे. जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. परंडा तालुक्यात दोन तर उस्मानाबाद, तुळजापूर, भूम , लोहारा या तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला आहे.
तुळजापूरातील रुग्ण पुण्याहून तर बाकीचे पाच ही रुग्ण मुंबईहुन आल्याची माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसात १३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ झाली त्यात १३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेवराई, माजलगाव पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झालाय...बीड जिल्ह्यात कोरोना हळूहळू हातपाय पसरू लागल्याचं चित्र आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातून ६६ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण मुंबई आणि ठाणे शहरातून बीड जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीतून ४१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळं जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १११७ झालीय. कोल्हापुरातल्या रुग्णांची संख्या १३४ वर पोहोचलीय. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यायत. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सर्व व्यक्ती ह्या मुंबईहून प्रवास करून कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार झालाय. जिल्ह्यात आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाचे अजून रुग्ण वाढलेत. गेल्या १२ तासांत ११ रुग्णांची भर पडलीय. धुळ्यात एकूण कोरोनाची ८१ रुग्ण संख्या झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात गेल्या २४ तासात ३७ कोरणा रुग्ण आढळून आले आहेत यात आज सकाळी बारा तर मंगळवारी २५ रुग्णांची भर पडली होती विशेष म्हणजे यातील ९० टक्के रुग्ण हे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातले आहेत . मालेगावात आजवर बाधित संख्या ६६१ वर पोचली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण ८५१ बाधित झालेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरनाच्या रुग्णांनी शंभरी गाठलीये. क्वारंटाईन केलेल्या एका २३ वर्षीय तरुणाची कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हा तरुण मुंबईतून हिंगोलीत आला होता. त्यापूर्वी त्याच्या सोबत आलेल्या वसमतच्या आठ रुग्णाचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेत. सध्या जिल्ह्यात १५ रुग्णांवर उपचार सुरु असून उपचारानंतर ८५रुग्ण बरे झालेत.
जालन्यात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून 41 झालीये. काही दिवसांपूर्वी शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील रुग्ण आणि डॉक्टरांचे नमुने घेण्यात आले होते.अखेर त्यातील 4 डॉक्टर आणि रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.