शिवसेनेचे तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी

शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी केली.

Updated: Jan 8, 2020, 06:36 PM IST
शिवसेनेचे तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी title=

मुंबई : उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत धक्कादायक घडमोडी पाहायला मिळाल्यात. शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा एकही सदस्य नसताना त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद हातची गेल्याने शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राणाजगदिशसिंग पाटील आणि तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा विजय झालेला दिसून येत आहे. राणाजगदिशसिंग पाटील यांच्या समर्थक अस्मिता कांबळे या अध्यक्षपदी तर तानाजी सावंत यांचे पुतणे उपाध्यक्षपदी ३० विरुद्ध २३ मतांनी विजयी झाले आहेत.

राणाजगदिशसिंग यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली होती. या ठिकाणी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राहिली आहे. परंतु राष्ट्रवादीचे राणाजगदिशसिंग पाटील हे भाजपमध्ये गेल्याने चित्र पालटले. तर नाराज तानाजी सावंत यांच्या निमित्ताने शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे येथे महाविकास आघाडी अपयश आले. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला मदत केल्याने सत्तेत परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फोल ठरला आहे.

उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी राणा पाटील म्हणजेच भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात स्वतःच्या पदरात उपाध्यक्ष पद मिळवले. त्यामुळे राणाजगदिशसिंग पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का देण्याचे काम शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनीच दिला आहे. तानाजी सावंत यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.