सातारा: राज्यातील कोरोना व्हायरसचा Coroanvirus प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना द्याव्यात. उगाच विरोध करु नये, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ते रविवारी साताऱ्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे काम सुरु असल्याचा दावा केला. मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल. सगळ्या गोष्टींची प्रोटोकॉलप्रमाणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मिशन मोडमध्ये आहोत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना तपासले जात नाही, हा प्रचार चुकीचा आहे. आम्ही खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या चाचणीसाठी अँटीजेन किट ठेवण्यास सांगितले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ५०० नव्या रुग्णवाहिका विकत घेणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनाबाबत कराडमध्ये बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब पाटील, राज्य मंत्री सतेज पाटील, शंभूराज देसाई, राजेंद्र पाटील यड्रावर यांच्यासह साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूरचे खासदार संजय मडलिक आणि दोन्ही जिल्ह्यातील अनेक आमदार उपस्थित होते.
दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोनाचे १२,८२२ नवे रुग्ण आढळले. एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे. यापैकी १,४७,०४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, तर ३,३८,२६२ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.