पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे तातडीने करा- देवेंद्र फडणवीस

पूरपरिस्थितीमुळे गडचिरोलीत ..... 

Updated: Aug 31, 2020, 04:59 PM IST
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे तातडीने करा- देवेंद्र फडणवीस title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विदर्भ विशेषत: पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

'मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उदभवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणार्‍या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे', असे ते म्हणाले.

फडणवीसांनी यावेळी पूरबाधित भागाविषयीची आकडेवारीही सादर केली. ज्यामधून भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत, गोंदियात 40 गावे पूरामुळे बाधित आहेत अशी माहिती समोर आली.

 

पूरपरिस्थितीमुळे गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ही परिस्थिती पाहता किमान आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर त्यांनी आळवला. सदर भागामध्ये एनडीआरएफची मदतही उशिरानं पोहोचल्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून पूरग्रस्त भागातील जनतेला वेळीच मदत करावी हा मुद्दा उचलून धरला. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली.