Onion Price Hike: टॉमेटोचे दर आवाक्यात येत नाहीत तर आता कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली एनसीआरसह अनेक ठिकाणी कांद्याचे दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. एक आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर 15 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. येत्या काही दिवसांत कांदा 100 रुपये पार करण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी टॉमेटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. काही ठिकाणी टॉमेटो 200 रुपयांपर्यंत पोहोचले होती. त्याचपद्धतीने आता कांद्याच्या दरातही मोठी वाढ होत आहे. दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. कांद्याचे दर वाढल्याने आता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने किंमत नियंत्रणात आणण्यासाठी खास तयारी करण्यात येत आहे.
कांद्याचे दर गगनाला भिडू नये म्हणून केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य ३१ डिसेंबरपर्यंत ८०० डॉलर प्रति टन केले आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी हे दर 400 डॉलर असे नियंत्रित करण्यात आले होते. मात्र आता दुप्पट केल्यामुळे भारतातील निर्यात 8% वरून थेट 2 टक्क्यावर येणार आहे.
राज्यात किरकोळ बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. बाजार समित्यांतही तो पाच हजारांपासून ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नवीन कांदा बाजारात दाखल होईपर्यंत किरकोळ दरात वाढ होऊ नये यासाठी सरकारने अधिक कठोर नियंत्रण आणले आहे.
सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यात कांद्याचा साठा करुन ठेवण्यात आला आहे. हा साठा बाहेर काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी स्वस्त कांदा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार दिल्ली एनसीआरमध्ये 25 रुपये किलोने कांदा विकत आहे. हे बफर स्टॉकमधील कांदे आहेत, जे जवळपासच्या राज्यांमधून खरेदी केले गेले आहेत. सरकार दोन सहकारी संस्था NCCF आणि NAFED आणि वाहनांद्वारे अनुदानित दराने 25 रुपये प्रति किलो दराने बफर कांदा विकत आहे.