निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच विजेच्या धक्क्याने १२ वर्षीय मुलगादेखील जखमी झाल्याची घटना मालेगावच्या बोहराबाग भागात घडली. शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मोहम्मद यासीन असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शकिल अहमद मुक्तार अहमद अन्सारी हे चंदनपुरी गेट ते मरीमाता मंदिर रस्त्याने जात होते. त्यावेळी बोहरा समाज कब्रस्तानसमोर असलेल्या विद्युत खांबावरील विजवाहिनी तार तुटून पडली. तुटलेल्या तारेवर शकिल अहमद व मोहम्मद यासीन या दोघांचाही पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यात मोहम्मद यासीन हा बाजूला फेकला गेल्याने बेशुद्ध पडला. तर शकील अहमद यांनी खांबाचा आश्रय घेतला. मात्र खांबातच विज प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून ते जागीच ठार झाले.
नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शकिल अहमद यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. विद्दुत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.