मुंबई : Omicron variant : देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे देशात रोज 14 लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कडक निर्बंधाच्या सूचना केल्या आहेत. आता राज्यातही Omicronचे रुग्ण वाढत आहे. हे लक्षात घेता मुंबईतल्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (Omycron crisis: Will schools be closed again ?, important information from the Education Minister Varsha Gaikwad)
ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सुरु झालेल्या शाळा बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. नाशिक आणि नवी मुंबईत शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु ठेवणार का, याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिकमधल्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला एक मुलगा बाधित आढळला. त्यामुळे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी अशा 90जणांच्या टेस्ट केल्यायत. त्यांचे अहवाल येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला.
दरम्यान, मुंबईत मुलांच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुंबई महानगर पालिकेच्या दोन शाळांमध्ये अजूनही तुरूंगच आहे. भायखळा पूर्व आणि पश्चिम इथल्या मुंबई महापालिकेत्या दोन शाळांत कैद्यांना ठेवलं जात आहे. त्यामुळे तब्बल 2800 विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निर्णयाविरोधात पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. भायखळ्याच्या एस ब्रिज शाळेत 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 20 शिक्षक शिकवतात.
इथल्या मुलांना सध्या भायखळा पश्चिमच्या साध्वी सावित्रीबाई फुले या शाळेत स्थलांतरित केलंय. तर भायखळा पूर्वेकडील पठाणाला रोड इथल्या शाळेतल्या 2300 विद्यार्थ्यांना पर्यायी शाळा मिळत नाही. दोन्ही शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग सातत्याने करत आहे. पण जेलसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोवर शाळेत कारागृहच राहणार असल्याचं चित्र आहे.