पुणे : लठ्ठपणा हा केवळ भारतातील नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तरी अधिकच गंभीर बाब आहे. नुकत्याच पुढे आलेल्या आकडेवारीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण आणि त्याचे परिणाम समोर आलेत. जो नक्कीच चिंतेचा विषय आहे. याबाबतचा हा विशेष रिपोर्ट...
आरोग्यम धनसंपदा हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य जपण्यासाठी देण्यात येणारा जणू तो एक कानमंत्रच.....मात्र हा कानमंत्र आजच्या पिढीचे विद्यार्थी आणि पालक साफ विसरले की काय हा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारी वरून पडतो.
कारण पुणे आणि मुंबई शहरातील ८ ते १४ वयोगटातील ३५ टक्के विद्यार्थी हे लठ्ठपणानं ग्रासलेले असल्याची धक्कादायक माहिती रोटरी क्लब आणि जेटी फाऊंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलीये. याखेरीज १८ टक्के विद्यार्थी स्थूल असून त्यांचीही वाटचाल लठ्ठपणाकडे होत आहे. या संस्थांनी पुणे आणि मुंबईत शहरातील २५ शाळांमधील ६००० विद्यार्थ्यांमध्ये हा सर्व्हे केला.
ज्या मध्ये खाजगी, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाच प्रमाण सारखंच आढळलं.
जंक फूडचं अतिसेवन, मैदानी खेळांऐवजी मोबाइल आणि कॉम्पप्यूटराईज गेम्स कडे असणारा मुलांचा ओढा आणि बदलेली जीवनशैली यामुळे हे प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र त्याचे परिणाम त्याहीपेक्षा जास्त भयंकर असल्याचं तज्त्रांचं म्हणणं आहे. लठ्ठपणाशी सामना करण्यासाठी जेटी फाउंडेशन आणि रोटरी क्लबनं Fight with childhood obesity हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाच्या लोगो चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
सर्वात तरुण देश म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारताला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं youngest country with highest number of sick patient अशा शब्दात ठणकावलय. त्यामुळे सर्वात तरुण देशाला जर सुदृढ बनवायचं असेल तर गरज आहे ती वाढणारा लठ्ठपणा रोखण्याची, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.