जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिकं करपलीय. उडीद, मूग, चवळी पिके पाण्याअभावी अक्षरशः करपली असून मका, ज्वारी, बाजरी कापूस पिकानेही जमिनीवर माना टाकल्या आहेत. पाणथळ जमिनीवरील पिकं कशीबशी तग धरून आहेत तर हलक्या प्रतीच्या तसंच पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवरील मात्र पिकं अक्षरशः जळालीय. शेतीवर लावलेला सगळा खर्च वाया जाणार असल्यानं शेतकरी हतबल झालाय.
अमळनेर तालुक्यात यंदा सलग तिसऱ्यांदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. जमिनीतच मुरणारा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्यात. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून खोलीकरण करण्यात आलेलं बंधारे, तलाव देखील कोरडे पडलेय. कूपनलिकाही आटल्या. त्यामुळे पावसाच्या पाण्यावाचून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालीय.
बँक, सोसायटीकडून पीककर्ज उचलून शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने यावर्षी शेती पेरली मात्र वरुणराजाच्या अवकृपेमुळं पेरलेली शेती डोळ्यादेखत वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. एकीकडे सरकार कर्जमुक्ती लांबवतंय तर दुसरीकडं यंदाही शेती पिकणार नसल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर आणखीनच वाढत जाणार आहे. यामुळे भाजप सरकार समोरची डोकेदुखी वाढणार आहे.