Nitesh Rane On Maratha Aarakshan: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊत आणि विनायक राऊंतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. "आज सकाळी संजय राऊत आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसला. एका बाजूला घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या बैठकीसाठी नाक रगडत फोटोसाठी याला आणि मालकाला यावं लागतं. आजच्या बैठकीला ह्यांना बोलावलं नाही त्याबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो," असं नितेश राणे म्हणाले.
पुढे बोलताना नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. "मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत. यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही?" असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा या उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांच्या मागणीसंदर्भात बोलताना नितेश राणेंनी, "तुमच्या घरातून सुरवात करा. तुम्ही राजीनामे द्या, मग दुसऱ्यांचे राजीनामा द्या. राजीनामा देतो असे बोलण्याची हिम्मत ठाकरे करतील का?" असा सवाल केला.
तसेच नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देताना, "बाळासाहेबांचे वारस असाल तर आजच्या बैठकीत आर्थिक निकषावर आरक्षण द्या हे तुम्ही बोलाल का?" असा प्रश्न विचारला आहे. "आमचं सरकार टिकणार आरक्षण देणार," असा विश्वासही नितेश राणेंनी व्यक्त केला.
"जरांगे पाटीलांनी राजकीय भाषा सुरु केली आहे. त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावू नये," असंही नितेश राणे म्हणाले. तसेच जाळपोळप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना आवाहन करताना नितेश राणेंनी, "जे निरपराध आहेत त्यांनी घाबरू नये. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करु," असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे बीडमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिसांचारासंदर्भात बोलताना नितेश राणेंनी "हिंसेचं समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये," असंही म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी, "उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचं चिन्हं, नाव आहे का? म्हणून चिरीमिरी लोकांना दंगल भडकवणाऱ्यांना बोलवलं नाही," असा टोला लगावला. तसेच नितेश राणेंनी जालन्यामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याच्या संदर्भातून टीका करताना, "'मातोश्री'चं पण इंटरनेट बंद करा तिथूनच दंगली भडकविल्या जातात. काड्या लावण्यात ज्याची पीएचडी झाली आहे. त्याने दुसऱ्याला काडेखोर म्हणू नये. त्याने काड्या लावण्याचे क्लास सुरू करावे. शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावं लागत. सरपंचपदाची निवडणूक लढविली नाही त्याला राज्य कस चालवाव हे समजणार नाही," असं संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं आहे. "समाज विघातक शक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसली आहे. पाहिले त्याला अटक करा," असंही नितेश राणे म्हणाले.