विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा

विधान परिषदेत उपसभापतीपदी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Jun 24, 2019, 08:59 AM IST
विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा  title=

मुंबई : विधान परिषदेत उपसभापतीपदी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूकही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 16 जून रोजी दिले होते. मात्र विधानसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडं असल्याने त्यांनी विरोधी पक्षांची ही मागणी पूर्ण न करता राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

विरोधी पक्षनेते हवे असल्यास विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवड जाहीर करावी अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना घातली. त्यामुळे अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याविना गेला. विरोधकांचाही नाईलाज झाल्याने अखेर आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर होत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांची निवड निश्चित मानली जात आहे. ती झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीचा मार्गही मोकळा होणार आहे.