नाशिक : Nashik police On Hanuman Chalisa and Bhonga : आता बातमी आहे मनसेच्या भोंग्यांबाबतची. मनसेच्या भोंग्यांवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चाप लावला आहे. मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर त्यांच्या समोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी विनापरवाना भोंगे तसेच हनुमान चालीसा पठणासाठी नाशिक शहरासाठी थेट आदेशच काढला आहे.
नाशिक शहरात विनापरवानगी भोंगे लावल्यास तडीपार अन्यथा चार महिने तुरुंगवास भोगावे लागणार आहे. मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. अन्यथा नाशिक शहरात आता भोंगे लावल्यास चार महिने तुरुंगवास भोगावे लागणार आहे.
भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट 4 महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून 6 महिन्यासाठी तडीपार करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतल्याने हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.
हनुमान चालीसा प्रकरणात नाशिकच्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी उशिरा मध्यरात्री आदेश काढत मनसेच्या भोंग्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना आता 3 मेपर्यंत पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना मशिदीपासून शंभर मीटर दूर अंतरावर आणि नमाजाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर पंधरा मिनिटांचे बंधन यामध्ये लावण्यात आले आहे. तसेच हनुमान चालीसा म्हणताना प्रदूषण महामंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण नियम पाळावे लागणार आहेत.