पत्रीपूल पाडल्यानंतर नव्या पुलाचं काम रखडलं, कल्याणकर संतप्त

धोकादायक झाला म्हणून कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्रीपूल ज्या उत्साहात पाडण्यात आला.

Updated: Jan 31, 2019, 06:06 PM IST
पत्रीपूल पाडल्यानंतर नव्या पुलाचं काम रखडलं, कल्याणकर संतप्त title=

आतीश भोईर, कल्याण : धोकादायक झाला म्हणून कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्रीपूल ज्या उत्साहात पाडण्यात आला. त्या उत्साहात त्याचं काम मात्र सुरू नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे नागरिक प्रचंड संतापले आहेत. सरकार कल्याण डोंबिवलीकरांच्या उद्रेकाची वाट पाहत आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कल्याण आणि डोंबिवली या अवाढव्य नगरांना जोडणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पत्रीपूल. ऑगस्टमध्ये हा पूल धोकादायक ठरवण्यात आला, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो संपूर्णपणे पाडण्यात आला. त्यामुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक पत्रीपुलाशेजारच्या नव्या पुलावरून करण्यात येत आहे. दोन्ही दिशांचा ताण एकाच पुलावर आल्यामुळे कल्याण शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. 

डोंबिवलीकडून पत्रीपुलाकडे दोन रस्ते येतात त्यापैकी एक म्हणजे कल्याण शीळ रस्ता आणि दुसरा म्हणजे ठाकुर्लीतून नव्याने बांधला गेलेला ९० फुटी रस्ता. या दोन्ही रस्त्यावर २४ तास प्रचंड वाहतूक सुरू असते. मात्र या सगळ्या वाहतुकीचा खोळंबा पत्रीपुलावर होतो. ३० डिसेंबरला नव्या पुलाचं थाटात भूमीपूजनही झालं. मात्र अजूनही स्थिती जैसे थेच आहे. इथल्या रखडलेल्या कामाचा फटका वाहनचालकांसोबत इथल्या व्यावसायिकांनाही बसत आहे. स्थानिक दुकानदार आणि मेट्रो मॉलमधील दुकानदार या कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीला जोडणारा दुसरा रस्ताच नाही. सर्व सरकारी यंत्रणा अक्षरशः ढिम्मं आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका तर नेहमीप्रमाणे आपला आणि शहराचा संबंधच नाही अशा आविर्भावात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बहुदा पूल बांधायचं विसरून गेला आहे. केवळ वाहतूक पोलीस इथे २४ तास अविरत राबत असतात म्हणून किमान इथलं जग रांगतंय तरी कल्याण डोंबिवलीकरांना कोणीही वालीच नाही हे खरं.