'कुटुंबापासून एकटं पडल्यासारखं वाटतंय' म्हणणाऱ्या अजित पवारांना नवा धक्का; 'या' व्यक्तीनंही सोडली साथ

New Nephew Vs Uncle Fight in Baramati: यापूर्वीही काका-पुतण्यादरम्यानच्या राजकीय अनेक उदाहरण राज्याने पाहिली आहेत. यामधील सर्वात प्रमुख उल्लेख ठाकरे कुटुंबाचा करावा लागेल. 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंविरोधात भूमिका घेतलेली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 21, 2024, 09:07 AM IST
'कुटुंबापासून एकटं पडल्यासारखं वाटतंय' म्हणणाऱ्या अजित पवारांना नवा धक्का; 'या' व्यक्तीनंही सोडली साथ title=
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीमधून नवी माहिती समोर आली आहे

New Nephew Vs Uncle Fight in Baramati: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2024 साली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांच्या 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिवसेना प्रकरणाचीच री ओढली. याचाच पुढील भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी काका शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह देखील काढून घेतलेय. शरद पवारांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' अशा नावाने पक्ष स्थापन करत त्याची मोर्चा बांधणी सुरू केली आहे. या घडामोडी सुरु असतानाच आता बारामतीमधून एक बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात आता नव्याने काका-पुतण्या वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवारांविरोधात पुतण्या मैदानात

अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी काकांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. युगेंद्र पवार शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असलेले युगेंद्र पवार हे आज बारामतीत शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात युवकांशी संवाद साधणार आहेत. अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात आपल्या कुटुंबाबद्दल भाष्य केलं होतं. आपल्या भाषणादरम्यान, संपूर्ण कुटुंब एकीकडे आणि मी एकीकडे आहे. मला एकटे पाडले असल्यासारखं वाटतं, असं जाहीर सभेत अजित पवारांनी सांगितलं होतं. हे सांगताना अजित पवारांना गहिवरूनही आले होते. असं असतानाचा ज्या पद्धतीने अजित पवारांनी सख्खे काका शरद पवारांविरोधात राजकीय भूमिका घेतली. अजित पवारांनी ज्याप्रकारे आपल्या सख्या काकांना सोडले तसेच अजित पवारांनाही त्यांच्याच पुतण्याने सोडल्याचं दिसत आहे. काका-पुतण्या राजकीय संघर्षाच्या या नव्या पर्वाची सध्या संपूर्ण बारामतीमध्ये चर्चा आहे.

काका-पुतण्या वादाची परंपरा

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका-पुतण्यादरम्यानच्या राजकीय संघर्षामध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार या जोडीचा समावेश झाला असला तरी यापूर्वीही काका-पुतण्यादरम्यानच्या राजकीय अनेक उदाहरण राज्याने पाहिली आहेत. यामधील सर्वात प्रमुख उल्लेख ठाकरे कुटुंबाचा करावा लागेल. 2006 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. मनसेच्या स्थापनेमुळे राज ठाकरे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे या काका-पुतण्या जोडीबरोबरच आदित्य ठाकरे विरुद्ध राज ठाकरे तसेच अमित ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे अशा विरोधी राजकीय भूमिका घेणाऱ्या काका-पुतण्यांच्या जोड्या तयार झाल्या. बीडमधील मुंडे काका-पुतण्या वाद महाराष्ट्रात सर्वश्रृत आहे. देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांच्या पुतण्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतलेली. गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंविरोधात भूमिका घेत राजकारणात सक्रिय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशज असलेल्या साताऱ्यातील भोसले राजघराण्यातही काका-पुतण्या वाद दिसून येतो. अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे पुतणे तसचे विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेत राहिला आहे.