Success Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, 'नीट'मध्ये 720 पैकी 700 गुण

NEET Success Story:डॉक्टर व्हायचंय म्हटलं तर कोटा आणि लातूरला जाव असंच लोक म्हणतात. मात्र बीडमध्ये राहून अनेक मुलांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बीडमध्ये राहणाऱ्या 50 हून अधिक मुलांनी 500 च्या वर गुण मिळविले आहेत. तर वरद या विद्यार्थ्यांनं तब्बल 720 पैकी 700 गुण मिळविले. त्यामुळे लातूरला आणि कोट्याला न जातागी डॉक्टर बनता येतं, घवघवीत यश मिळवता येत हे या विद्यार्थ्यांना अधोरेखित केले.

Updated: Jun 14, 2023, 02:27 PM IST
Success Story: शिक्षकाचा मुलगा बनला डॉक्टर, 'नीट'मध्ये 720 पैकी 700 गुण title=

विष्णू बुरगे, झी 24 तास, बीड: डॉक्टर घडविण्याच्या कोटा आणि लातूर पॅटर्नमध्ये आता बीड पॅटर्नची देखील चर्चा यंदा सुरू झालेली आहे. यामागे कारणही तसंच आहे. बीडच्या वरदने नीट परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण मिळवून आई-वडिलांचे नाव उंचावले आहे.

डॉक्टर व्हायचंय तर चांगले गुण मिळवावे लागतात. त्यासाठी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगले क्लासेस लावले पाहिजे अशी बीडच्या तरुणांची आतापर्यंतची समज होती. याच हेतूने बीडमधील अनेकजण लातूर आणि कोटा या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेतात. अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना येथे शिकवण्यासाठी पाठवतात. शिकवणी वर्ग राहण्याचा खाण्याचा खर्च या सर्वांचा विचार केला तर लाखो रुपये  विद्यार्थ्यावरती खर्च केला जातो. मात्र हमखास यश मिळेल याची शाश्वती नसते. अनेकदा विद्यार्थी आणि पालकांच्या हाती निराशा लागते. दरम्यान बीडमध्येच राहून अभ्यास केला त्याला चांगल्या शिकवणीची जोड मिळाली तर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि हमखास यश मिळू शकतं हे बीडच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलंय.

बीडच्या रवी किरण संकुल आता शिकणाऱ्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे ही सर्व मुलं सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. यापैकी अनेक जणांचे पालक हे ऊसतोड मजूर तर इतर मजुरी करणारे आहेत. तर काहीजण नोकरी करणारे आहेत. लातूर आणि कोटा यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्याची ऐपत नाही म्हणून या विद्यार्थ्यांनी बीडमध्येच डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे बीडच्या या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केला आहे.

योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची योग्य पद्धत आणि सातत्य ठेवलं तर आपण यश संपादन करू शकतो. हे या विद्यार्थी आणि शिक्षकांनी दाखवून दिले. या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचा बीड पॅटर्न सुद्धा होऊ शकतो हा विश्वास पुढच्या पिढीत निर्माण केला आहे.