Jayant Patil Meeting Amit Shah: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मी कालपासून मुंबईतच आहे. मी पुण्याला गेल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमेच चालवत आहेत. या बातम्यांमुळे माझं मनोरंजन झालं असं जयंत पाटील यांनी या भेटीच्या वृत्तासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. मी पुण्याला गेलो हे तुम्हीच सांगताय. मी अमित शाहांना भेटलो आणि अजित पवार गटाबरोबर जाणार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? अशा राजकीय वर्तुळात चर्चा असतील तर जे चर्चा करतात त्यांना जाऊन विचारा. माझ्यासारख्या गरीबाला का विचारता? मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे आणि उद्याही इथेच असणार. मला का विचारताय? असा प्रतिप्रश्न जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना केला.
मी अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा. बातम्या तुम्हीच तयार केल्या. मी काय सांगितलं का तुम्हाला? मी कशासाठी स्पष्ट करायचं? रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा मी धंदा काढलेला आहे की काय? अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना लक्ष्य केलं. "तुम्ही बातम्या तयार केल्या. तुम्ही त्या बातम्या संपवा. तुम्ही ज्या बातम्या चालवल्या ज्यामुळे मी कुठं गेलो, कसा गेलो त्याचे काही पुरावे दिसले, माहिती मिळाली तर त्यावर बातम्या करा. आता रोज उठून नव्या बातम्या करायला लागलात, एखाद्याबद्दल महराष्ट्रात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर हे बरोबर नाही. खरं तर काय झालं काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्याने केला पाहिजे. सकाळपासून मला सगळ्या मनोरंजक बातम्या मिळत आहेत. सगळ्या बातम्या येत आहेत. मी इकडे गेलो, पुण्याला गेलो. राजेश टोपे, अनिल देशमुख, सुनील भुसाला, मी आणि माझ्याबरोबर अजून एकजण रात्री एक दीड वाजेपर्यंत इथेच बसलो होतो. सकाळी शरद पवारांच्या घरी होतो तर मी तिकडे कधी गेलो? काल संध्याकाळी पवार साहेबांच्या घरी होतो," असं जयंत पाटील म्हणाले.
महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही देखील सहभागी होत असल्याच्या चर्चा आहेत, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी, "आता त्या तुम्ही केल्यात चर्चा त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. माझा काय संबंध आहे. तुम्हीच बातम्या तयार केल्या. मी काही बोललोय, कोणाला भेटलोय असं काही आहे का? असं नसेल तर तुम्ही परस्पर बातम्या केल्या तर सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चालला असेल तर तो गोंधळेल. जर कुठे जायचं असेल तर तुम्हाला भेटून सांगेलच. त्यात काय विशेष आहे? विनाकारण बातम्या देता," अशी प्रतिक्रिया नोंदवली. "मी सकाळी पवार साहेबांकडे होतो. काल संध्याकाळी त्यांच्याकडे होतो. माझा पक्ष मोठा झाला पाहिजे असा माझा कायमच प्रयत्न असतो. तर तुम्ही अशा बातम्या पसरवायला लागल्या तर तुम्हीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. 'जर-तर'चे प्रश्न विचारणं आवश्यक आहे का?" असंही जयंत पाटील म्हणाले.
अशा बातम्या पसरवून तुमची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय का अजित पवार गट किंवा भाजपाकडून? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी, "अजित पवार गट, भाजपा अशा बातम्या पेरतो असं मी म्हणणार नाही. पेरणारे तुम्ही. तुम्ही बातम्या पेरता. त्यांना काही बडबडून फायदा नाही. बातम्या तुमच्या चॅनेलवर येत आहेत. माझी प्रसिद्धी तुम्ही करता यासाठी मी तुमचे आभार मानले पाहिजेत. माझ्यावर कोणाचा दबाव नाही. कोणी मला काही सांगितलेलं नाही. मी कधी कोणाबद्दल काहीही चर्चा केलेली नाही," असं म्हणाले.