ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंगे उतरवा अशी घोषणा केली होती. याचे राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथल्या तन्नवर नगर परिसरातही याचे पडसाद पाहिला मिळतायत. राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेची वाहतूक सेनेचं कार्यालय असलेल्या 'राजगडवर'चा फलक उतरवावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू असा इशारा दिला होता.
याप्रकरणी मुंब्रा मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याासाठी पोलिसांनीही सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखेच्या कार्यालच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित कार्यकर्त्यांना नोटीस बजावली.
पण दोन दिवसांनंतर वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारुन मनसेचा फलक फाडला. फलकावर दगड मारतानाची दृष्य CCTV त कैद झाली आहेत. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या गुंडांनीच ही दगडफेक केल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसंच ही गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी भोग्यांना विरोध केला आहे, नमाज पठण करण्यासाठी नाही, आपण स्वत: मुस्लिम असून मनसे सोबत आणि राज ठाकरे यांच्यासोबत ठाम असल्याचंही इरफान सय्यद यांनी म्हटलं आहे.