NCP MLA`s to meet Sharad Pawar : शपथ घेत मंत्रीपदावर विराजमान झालेले 'ते' आमदार शरद पवारांची भेट घेणार?

NCP MLA`s to meet Sharad Pawar : शपथ घेतलीये खरी, आता पुढे काय? राष्ट्रवादीचे 'ते' आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला जाणार. नेमकं काय सुरुये?  

सायली पाटील | Updated: Jul 3, 2023, 10:57 AM IST
NCP MLA`s to meet Sharad Pawar : शपथ घेत मंत्रीपदावर विराजमान झालेले 'ते' आमदार शरद पवारांची भेट घेणार?  title=
ncp mlas who took oath along will try to meet supremo sharad pawar

NCP MLA`s to meet Sharad Pawar : रविवारी झालेल्या सत्तानाट्यानंतर आणि राष्ट्रवादीती बंडखोरीनंतर अजित पवार मुंबईतून सूत्र हलवत असतानाच शरद पवार मात्र 'एकला चलो रे' म्हणत आता पक्षबांधणीसाठी स्वत: राजकारणाच्या रिंगणात उतरले आहेत. असं असतानाच ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली ते सर्व 9 जण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

प्राथमिक माहितीनुसार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर नव्यानं विराजमान झालेले राष्ट्रवादीचे अजित पवार हेसुद्धा या आमदारांसह शरद पवार यांच्या भेटीला येणार आहेत. या भेटीसाठी मंत्र्यांनी पवारांकडे वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी 'झी 24तास'ला दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बंडानंतरच्या या भेटीत नेमकं काय घडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, शरद पवार कराडला रवाना झाले असून, सोमवारी रात्रीपर्यंत ते मुंबईत परतणार आहेत. त्यामुळं आता पक्षातील या बंडखोर गटाला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नेमकी केव्हा भेट देणार हे पाहणं महत्त्वाचं. 

हेसुद्धा वाचा : Sharad Pawar VIDEO : 'हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं';  वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज 

कोणकोण घेऊ शकतं शरद पवार यांची भेट? 

अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आदिती तटकरे, धर्मराव बाबा आत्राम आणि अनिल भाईदास पाटील हे मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार शरद पवारांच्या भेटीला जाऊ शकतात. 

राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांचा फोन... 

दरम्यान, रविवारच्या भूकंपानंतर अजित पवार पुन्हा एकदा नव्यानं पक्षाला हादरा देताना दिसत आहेत. ज्यासाठी त्यांनी पक्षातील काही आमदारांना संपर्कही केल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी राजभवनात शपथ घेताना एनसीपीच्या दोन तृतीयांश आमदारांनी स्वाक्षरी केली असा दावा अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी केला आहे. आता अजित पवारांसोबत आणखी तीन ते चार आमदार येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये 

राष्ट्रवादीतून सख्ख्या पुतण्यानंच बंड केल्यानंतर आता शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. कराड दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार यांना असणारी समर्थकांची साथ पाहतानाच हे लक्षात आलं. जिथं कराडकडे मार्गस्थ झालेलं असताना पवारांचं खेड शिवापूर टोलनाक्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. साताऱ्यात वेळे येथेही शरद पवारांचं आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. शरद पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे. झालं गेलं मागे सारत आता पवारांनी पुन्हा एकदा जनतेत जात रणशिंग फुंकण्याची हाक दिलीय. जिथं त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची आणि पक्षातील युवा नेत्यांचीही साथ मिळताना दिसतेय.