सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसाला जायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली.
या बैठकीला विधान परिषद सभापती रामराजे नाईक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे , मकरंद पाटील, नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले छत्रपती यांच्या वाढदिवसाची आज, साताऱ्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील बडी नेते मंडळी साताऱ्यात दाखल झाली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.
राज्यातील दिग्गज नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असताना सोहळ्याला नेमके कोण कोण हजेरी लावणार, याची उत्सुकता लागली आहे. खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचेच नेते आहेत. मात्र, त्यांच्याच सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खासदार उदयनराजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकतर्फी निवडून आले आहेत. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या व्यासपीठावर कोण कोण नेते हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आपल्या वेगळयाच शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साता-याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा एक्कावन्नावा वाढदिवस आज साजरा होत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजे भोसले यांनी, शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.
या शाही वाढदिवसाची जय्यत तयारी झाली असुन मुख्यमंत्र्यासह निम्मे मंत्रिमंडळ साता-यात दाखल झाले असुन शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचीही उपस्थिती राहणार आहे. निमित्त वाढदिवसाचे असले तरी उदयनराजे यानी लोकसभेसाठी राष्ट्रवादीवर दबाव आणुन प्लॅन बीची तयारी केलीय.