मंत्रिपदाची शपथ घेऊन छगन भुजबळांची शरद पवारांना 'गुरूदक्षिणा'?

अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ हे त्यातलं सगळ्यात आश्चर्यकारक नाव होतं. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. आणि भुजबळ आता संपले असं म्हणणाऱ्यांना भुजबळांनी पुन्हा खणखणीत उत्तर दिलं.

Updated: Jul 2, 2023, 09:51 PM IST
मंत्रिपदाची शपथ घेऊन छगन भुजबळांची शरद पवारांना 'गुरूदक्षिणा'? title=

ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई: अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ हे त्यातलं सगळ्यात आश्चर्यकारक नाव होतं. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. आणि भुजबळ आता संपले असं म्हणणाऱ्यांना भुजबळांनी पुन्हा खणखणीत उत्तर दिलं.

राजकीय नियतीशी अनेकवेळा लपंडाव खेळलेला हा हरफनमौला नेता आहे. भुजबळ संपले, सद्दी संपली अशा तमाम राजकीय हिशोबांना खोटं ठरवत मंत्रिपदाची माळ गळ्यात कायम ठेवलेला हा राष्ट्रवादीतला फिनिक्स मानला जातो. शिवसेनेचा एकेकाळचा फायरब्रँड, शाखाप्रमुख, महापौर आणि मग आमदार असा त्यांचा प्रवास होता. त्यानंतर बाळासाहेबांशी मंडल आयोगावरुन मतभेद झाल्यावर याच लखोबाला शिवसैनिकांनी पळता भुई थोडी केली होती. 

पवारांच्या वळचणीला आल्यावर भुजबळ काँग्रेस आणि मग राष्ट्रवादीत रमले. पुढे बाळासाहेबांवर खटला भरुन बाळासाहेबांच्या अटकेची धमक दाखवणारे गृहमंत्री ठरले. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भाजप सत्तेत असताना २०१६ मध्ये भुजबळांना ईडीनं तुरुंगात टाकलं. तब्बल २ वर्षांनी भुजबळ तुरुंगाबाहेर आले. शाल गुंडाळलेल्या भुजबळांना पाहिल्यावर त्यांची कारकीर्द संपली असं भाकीत केलं गेलं. त्याला चुकीचं ठरवत भुजबळांनी मफलर आणखी स्टाईलनं गुंडाळला आणि २०१९ मध्ये मविआ सरकारमध्ये मंत्री झाले. 

एकेकाळी भुजबळ तुरुंगात असताना भुजबळांचा सॅम्पल फ्लॅट बांधून ठेवलाय, असं इतर नेत्यांना सांगितलं जायचं, अशी चर्चा होती. आता याच भुजबळांना मंत्री पदाचा बंगला मिळणार आहे.

२०१९ मध्ये पवारांच्या आशीर्वादानं मंत्री झालो म्हणणाऱ्या भुजबळांनी आज अजित पवारांबरोबर शपथ घेऊन पवारांना गुरूदक्षिणा दिलीय का? असा प्रश्न विचारला जातोय.