Chhagan Bhujbal: अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. ज्येष्ठ नेते असतानाही लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर आणि त्यानंतर राज्यसभा निवडणुकीतही डावलण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून दुसरा राजकीय पर्याय शोधण्याचा दबाव टाकला जात आहे. यादरम्यान छगन भुजबळ पुन्हा एकदा पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच मोठी घडामोड घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्यांमुळे ही भेट महत्त्वाची ठरत आहे. सूत्रांनुसार, छगन भुजबळ यांना पक्षात स्वीकार करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत ठाकरे गटातील नेत्यांशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत. छगन भुजबळ यांनी शिंदे गटातील विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आपले पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा केला आहे. सोबतच स्वतःसाठी येवला विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. यापूर्वी ठाकरे गटाने येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात पक्षाचे स्थानिक नेते कुणाल दराडे हे संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केले होते.
ही बातमी 100 टक्के असत्य आहे असं सांगत छगन भुजबळ यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. त्यांनी 'झी 24 तास'ला माहिती देताना सांगितलं की, "8 जूनला अजित पवारांच्या घरी बैठक होती. आम्ही दिवसभर तिथेच होतो, चर्चा सुरु होती. 13 जूनला सुनेत्राताईंचा राज्यसभेचा फॉर्म भरण्यात आला. 14 जूनला मी पुण्याला गेलो होतो. महात्मा फुले वाडाच्या कामासंदर्भात अजितदादांनी बैठक बोलावली होती. तिथून मी नाशिकला गेलो. नाशिकला 15 जूनला येवल्यात होतो. 16 जूनला संध्याकाळी मी परत आलो. मी नाराज नाही आणि कोणाला भेटलेलो नाही. 100 टक्के मी भेटलेलो नाही. त्यांना शपथेवर भेट झाली का विचारा. काहीही सांगितलं जात आहे".
"सरकारमध्ये छगन भुजबळ राहतील असं वाटत नाही. ते दुसरा मार्ग स्विकारतील का हे माहिती नाही. पण घुसमटल्यासारखं वाटत असेल तर थांबणार नाहीत", असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
- लोकसभेला दिल्लीतून ग्रीन सिग्नल असतांना उमेदवारी जाहीर करायला विलंब केल्यानं भुजबळांनी माघार घेतली
- फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असतांना चंद्रपूर वगळता भुजबळांना निवडणुकीत प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं
- राज्यसभेला संधी असतांना भुजबळांना संधी देण्यात आली नाही, त्यामुळे दिल्लीत जाऊन मंत्रिपद पदरात पाडून घेण्यात भुजबळांना यश आलं नाही
- केंद्रातील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच राज्यमंत्री मिळणार असल्यानं प्रफुल्ल पटेल त्यासाठी आग्रही
- पक्षातील अंतर्गत कलह बघता भुजबळांना राज्यसभेसह मंत्रिपदापासून दूर राहावे लागणार अशी शक्यता अधिक
- भुजबळांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात कमळ असल्याचं उघडपणे सांगितल्याने त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या असे असतांना एकदा कार्यालयातुन बाहेर पडत असताना थेट बागेतील कमळ हातात घेऊन भुजबळांनी केलंले फोटोसेशन भाजप प्रवेशाच्या चर्चेचा विषय बनलं होत
- अशातच सगेसोयरे बाबत सरकारमध्ये अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींवर अन्याय होईल असे सांगून अजित पवार ठोस भूमिका घेत नसल्यानं भुजबळ नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चाय
- त्यामुळे पक्षाद्वारे केंद्रात जाण्याची संधी परिणामी केंद्रीय मंत्रीपदाची गेलेली संधी आणि ओबीसींच्याबाबत अजित पवारांची सावध भूमिका बघता भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये
- त्यामुळे भुजबळ शिवसेनेची किंवा भाजपची वाट धरणार का ? की वेगळा पर्याय निवडणार हे बघणं महत्वाचे ठरणार