बारामती : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं दिसत आहे.
एसटी संपावर तोडगा काढण्यात परिवहनमंत्री दिवाकर रावते अपयशी ठरलेत. त्यामुळं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केलाय. मुख्यमंत्र्यांनी यात तातडीनं मध्यस्थी करून संप मिटवावा, असं आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे.
तर, तिकडे एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. एसटी संपात तोडगा काढण्यासाठी न्यायालयानं सरकारचे तसेच कर्मचारी संघटनेचेही कान उपटले आहेत.
गेल्या वेळी आश्वासन दिल्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत उच्चस्तरीय समिती का नेमली नाही? संप मिटवण्यासाठी तुमच्याकडं काय ठोस धोरण आहे? असे तिखट सवाल न्यायालयानं सरकारला केले आहेत.