भंडारा-गोंदियामध्ये पुन्हा मतदान घ्या, राष्ट्रवादीची मागणी

 भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रांचा गोंधळ दिसून येतोय.

Updated: May 28, 2018, 04:46 PM IST

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रांचा गोंधळ दिसून येतोय. या गोंधळामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने भंडारा गोंदियामध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत ३५ मतदान केंद्रावरचं मतदान रद्द करण्यात आलं आहे. सकाळपासून ६० ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. त्यापैकी अनेक ठिकाणी तंत्रज्ञांना बोलावून बिघाड दूर करण्यात आले. पण ३५ ठिकाणी बिघाड दूर होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे इथली मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आलीय.

दरम्यान, ३५ ठिकाणी पुन्हा मतदान कधी होणार याबाबत कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. २०१४मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नाना पटोलेंनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करुन खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटले यांच्यात जागेसाठी चुरस आहे.

फेरनिवडणुकीची मागणी

मतदान यंत्राच्या गोंधळामुळे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केलीय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही फेर मतदानाची मागणी केलीय. भंडारा-गोंदियामध्ये २१०० पैकी साडेचारशे ईव्हीएम बंद पडल्याची माहिती मिळालीय. ही संख्या मोठी असल्याने इथं पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीय.