विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी

 आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 8, 2017, 02:18 PM IST
विधानभवनाच्या पायऱ्यांवरही सोनूचा जलवा; विरोधकांनी केली सरकारची कोंडी title=

मुंबई : सोनू तुझा मायावर भरोसा नाय का? या गाण्याने अवघा सोशल मीडियाच नव्हे तर, महाराष्ट्रही ढवळून काढला. आता या सोनूचा जलवा सोशल मीडियापुरता मर्यादीत न राहता तो, विधानभवनाच्या पायऱ्यांवरही पोहोचला आहे. या गाण्याच्या चालीवर ‘सोनू, तुझा सरकारवर भरवसा नाय का?’असे म्हणत पावसाळी अधिवशनादरम्यान विरोधकांनी सरकारला मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. आक्रमक विरोधकांनी घोटाळ्यांचे आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

भाजप नेते आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. त्यामुळे सरकारला अधिकच बॅकफूटवर जावे लागले आहे. याचाच फायदा उठवत विरोधकांनी सरकारची कोंडी केली असून, दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लाऊन धरली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या जवळच्या बांधकाम व्यवसायीकाला लाभ मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी संपादित केलेल्या ६०० एकर आरक्षित भूखंडातून ४०० एकर जमीन वगळल्याचा आरोप सुभाष देसाईंवर करण्यात आला आहे. तर, प्रकाश मेहता हे एसआरए घोटाळ्यात यापूर्वीच अडचणीत आले आहेत. अर्थात सरकारने दोन्ही मंत्र्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. पण विरोधक मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत या मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान, सभागृहात चर्चा सुरू असताना विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ पहायला मिळाला. या गोंधळातच विरोधकांनी सभात्याग केला. सभात्याग केल्यावर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘सोनू, तुझा सरकारवर भरवसा नाय का?’ अंस म्हणंत सरकारला चांगलेच लक्ष केले.