राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करणार संयुक्त हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत.

Updated: Dec 11, 2017, 08:43 PM IST
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करणार संयुक्त हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. विशेष म्हणजे आपला ७७ वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार या मोर्चाचे राष्ट्रवादीतर्फे नेतृत्व करणार आहेत. तर काँग्रेसकडून गुलाबनवी आझाद मोर्चात अग्रभागी असणार आहेत. 

राष्ट्रवादीचा हल्लाबोल नागपूरात दाखल 

राष्ट्रवादीने १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून सुरू केलेली सरकार विरोधातील हल्लाबोल यात्रा नागपूरात दाखल झाली आहे. याच यात्रेचे मोर्चात रुपांतर होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मोर्चा आयोजित केला असला तरी या मोर्चाची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणावरून होणार आहे. 

मोर्चाची सुरूवात वेगवेगळी होणार

आपापल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आणि कोण किती लोक मोर्चासाठी जमवते हे बघण्यासाठी मोर्चाची सुरूवात वेगवेगळी होणार आहे. या मोर्चाची सांगता विधानभवनजवळील मोर्चा पॉईंटवर होणार आहे. इथे शरद पवार, गुलाबनवी आझाद यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेत्यांची भाषणे होणार आहेत. या मोर्चात अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.