Sharad Pawar VIDEO : 'हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं'; वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज

Sharad Pawar : वयाच्या या टप्प्यावरही पुन्हा एकदा पक्ष उभा करण्याची वेळ पवारांवर आलीय.. मात्र अत्यंत मिश्किलपणे.. खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत. पाहुया एक खास रिपोर्ट... 

सायली पाटील | Updated: Jul 3, 2023, 08:55 AM IST
Sharad Pawar VIDEO : 'हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं';  वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज  title=
(छाया सौजन्य- पीटीआय) / ncp Ajit pawars rebel made sharad pawar to come in action mode at the age of 83

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसणार आहे. आपल्यांनीच दगा दिलेला असताना ही बंडखोरी उलथून पाडत नव्यानं उभं राहण्याची वेळ पवारांवर आली. 

इथंही न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत. नकळतच ज्यांनी बंड केलंय त्यांनाही ते एकनिष्ट राहण्याचे धडेही देतायत असं म्हणायला हरकत नाही. कारण, पक्षातले ज्येष्ठ आमदार, कार्यकारी अध्यक्ष सख्खा पुतण्या सोडून गेलेला असताना पवारांचा हा मिश्किलपणा  खूप काही सांगून जातो. 

राष्ट्रवादीला यापूर्वीही पडलं खिंडार... 

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक आजी-माजी आमदार पक्ष सोडून जात होते. दिग्गज नेते भाजपप्रवेश करत होते. पवारांचं राजकारण संपलं अशी टीका पवारांवर होत होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 10 आमदारही निवडून येणार नाहीत असे प्रहार भाजप-शिवसेनेकडून होत होते. मात्र त्याही परिस्थितीत पवार उभे राहिले. 

हेसुद्धा वाचा : Sharad Pawar : पुतण्याच्या बंडानंतर काकांची पहिली चाल; शरद पवार Action Mode मध्ये 

राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरले. भर पावसात सभा घेतली आणि एकतर्फी वाटणारा सामना फिरवला. तेव्हाही पवार वयाच्या 80 व्या वर्षात प्रवेश करत होते. पण, उत्साह मात्र एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल इतका. आपल्या विचारांनी पद्धतीनं पवारांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं अन् भाजपच्या एकहाती विजयात शड्डू ठोकून उभे ठाकले. 80 वर्षांचा तरुण असा पवारांचा उल्लेख त्यावेळी सोशल माध्यमांवर पाहायला मिळाला.

पवारांचा आशीर्वाद अन् बरंच काही 

पुढे महाविकास आघाडीचा प्रयोगही पवारांच्या आशीर्वादानंच पार पडला. मविआ सरकारमध्ये अनेक मंत्र्यांवर, विशेषत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याही वेळी पवार स्वत: पत्रकार परिषद घेत मैदानात उतरले. एकहाती खिंड लढवली. मविआ कोसळल्यानंतर पवार राष्ट्रीय पातळीवर विरोधी ऐक्यासाठी झटत राहिले. पवारांचा हा सक्रियपणा दिसतोय तो वयाच्या 83 व्या वर्षी. 

आता अजित पवारांच्या सरकारमध्ये सामील होण्यानंतर पुन्हा एकदा पवारांसमोर आव्हान उभं ठाकलंय.. घरातून आव्हान उभं ठाकल्यानंतरही ना पवारांचा मिश्किलपणा कमी झाला, ना लढाऊ वृत्ती. पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत. 1980 च्या दशकात आपण कशापद्धतीनं पक्ष बांधला याची आठवण खुद्द पवारांनीच करुन दिली. 

मुख्य म्हणजे राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतरही पवारांच्या चेहऱ्यावर ना त्रास जाणवत होता, ना भविष्याचं टेन्शन. उलट मिश्किलपणे पक्ष 'पुन्हा बांधू' असं म्हणत वयाच्या 83 व्या वर्षी पवार सज्ज झालेत. या तरुण मनाच्या नेत्याकडून फक्त नेतेमंडळींनीच नव्हे तर तुम्हीआम्हीही खूप शिकावं.