मुंबई : अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने यूटर्न घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे सांगत नगरची जागा काँग्रेसला सोडलेली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असल्याचे जयंत पाटील म्हणालेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला सोडण्याचं जाहीर केले होते. मात्र त्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करुन ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला असे वाटत असताना राष्ट्रवादीने नगरच्या जागेवर पुन्हा दावा केला आहे. त्यामुळे आघाडीत अजून जागा वाटपाबाबत एकमत नसल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे. नगरच्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. तो वाद पवार यांनी टाळण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडण्याचे संकेत दिले. तसे त्यांनी मीडियाशी बोलतना स्पष्टे केले. मात्र, प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी याबाबत खुलासा केला. ही जागा आम्हीच लढणार आहोत. त्यामुळे नगरच्या जागेवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये फिस्कटणार असेच दिसत आहेत.
काही प्रसारमाध्यमांनी अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षासाठी सोडली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून याबद्दलच्या बातम्या तथ्यहीन आहेत.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 1, 2019
लोकसभेची अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नगरमधून काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीवर सुजय पाटील इच्छुक होते. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती. या जागेवर त्यांनी दावाही ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीत ही जागा मी लढवणार आणि जिंकणार, असा विश्वासही व्यक्त केला होता. मात्र, या जागेवरील दोन्ही काँग्रेसमधील आघाडीत वितुष्ठ येण्याची शक्यता होती. सुजय पाटील यांनी पक्षाकडून उमेदावीर मिळाली नाही किंवा राष्ट्रवादीला ही जागा गेली तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे हातची जागा जाण्याची शक्यता होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. आता पुन्हा राष्ट्रवादीने दावा केल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.