सुलताना तोकडे कपडे घालते म्हणून भावांनीच केलं 'हे' दुष्कृत्य...

नवी मुंबईतील उलवे सेक्टर-19 मध्ये राहणाऱ्या सुलताना फारुख खान या 28 वर्षीय तरुणीची तिच्या दोघा सख्या लहान भावांनी गळा आवळुन हत्या करण्याचा प्रयत्न केला

Updated: Jun 3, 2022, 07:18 PM IST
सुलताना तोकडे कपडे घालते म्हणून भावांनीच केलं 'हे' दुष्कृत्य... title=

स्वाती नाईक, झी २४ तास, नवी मुंबई : नवी मुंबईतील उलवे सेक्टर-19 मध्ये राहणाऱ्या सुलताना फारुख खान या 28 वर्षीय तरुणीची तिच्या दोघा सख्या लहान भावांनी गळा आवळुन हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तपासात याबाबत मोठा खुलासा झालाय. सलमान मोहम्मद फारुख खान वय 20 आणि शाहरुख मोहम्मद फारुख खान वय 22 वर्ष अशी या दोघा भावांची नावं असून NRI पोलिसांनी या दोघांना उत्तरप्रदेशमधील मेरठ येथून अटक केली आहे.

सुलताना हिने दोघा भावांना पैसे पाठविणे बंद केले होते. तसेच ती तोकडे कपडे घातलेले फोटो सोशल मिडीयावर टाकात असल्याने समाजात बदनामी होत असल्यामुळे या भावांनी हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.   

या घटनेतील जखमी सुलताना ही उलवे सेक्टर-19 मध्ये एकटीच राहण्यास होती. सुलताना ही कोपरखैरणेतील बेला बारमध्ये कामाला असताना, कळंबोली येथे राहणाऱ्या रोहन हमंत वय 25 वर्षे या हॉटेल व्यावसायीकासोबत तिची चांगली मैत्री झाली. 25 मे रोजी सुलताना आणि रोहन या दोघांनी उलवे येथील घरामध्ये जेवण केल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास रोहन कळंबोली येथे आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर रोहनने मध्यरात्रीच्या सुमारास सुलतानाच्या मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुलताना हिच्याकडुन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या दिवशी सायंकाळी रोहन सुलतानाच्या घरी गेला. सुलताना आपल्या घरामध्ये जखमी आणि बेशुद्धावस्थेत आढळुन आली होती.  

त्यानंतर रोहनने तिला नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. या तपासादरम्यान सुलतानाच्या घरी 25 मे रोजी रात्री तिचे दोघे भाऊ येऊन तत्काळ मेरठ येथे आपल्या गावी निघुन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनीच सुलतानाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव व त्यांच्या पथकाला उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आले होते.  

सदर पथकाने मेरठमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुलतानाच्या दोघा भावांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनीच सुलतानाचा गळा आवळल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघा भावांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या घटनेतील जखमी सुलताना हिच्यावर सध्या नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

navi mumbai two brother tries to finish sister sultana for wearing short skirt