Mumbai Local News Today: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग 12 जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेलहून व उरणहून मुंबई, नवी मुंबईला जाणे सोप्पे होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पाची प्रतीक्षा होती. आता अखेर हा प्रकल्प सुरू होत आहे. (Pm Modi Navi Mumbai Visit)
उरण- खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या रेल्वेमार्गामुळं नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढणार आहे. कारण नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवा झेंडी दाखवून त्याचे उदघाटन पंतप्रधान करणार आहेत. याशिवाय इतर रेल्वे प्रकल्प त्यामध्ये ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक 'दिघा गाव' तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे.
खारकोपर-उरण या रेल्वेमार्गावर 12 मार्च रोजी चाचणी घेण्यात आली होती. अनेक चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्णही झाल्या होत्या. हा रेल्वे मार्ग 27 किमी लांबीचा आहे. यातील पहिल्या टप्पा कधीच सुरू झाला आहे. 12.5 किमी अंतरापर्यंत रेल्वे सेवा सुरू झाली आहे. यात नेरूळ, सीवूड्स, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामण डोंगरी, खारकोपर ही स्थानके आहेत.
खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील लोकल सेवा आता उद्यापासून सुरू होणार आहे. या रेल्वेमार्गावर पाच स्थानके असणार आहे. 14.6 किमी रेल्वे मार्गावर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही पाच रेल्वे स्थानके आहेत. या नव्या रेल्वे मार्गामुळं सीएसएमटी ते उरण असा थेट रेल्वे प्रवास करता येणार आहे. उरण शहराशी मुंबई, नवी मुंबई जोडले जाणार आहेत.
नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या एकूण अकरा रेल्वेस्थानकांचा यात सामावेश आहे.