सॅल्युट ! अंत्ययात्रा थांबवून सामूहिक जन गन मन अभियान

 National Anthem : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक जन गन मन अभियान राबविण्यात आले. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने आवाहन केलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायनला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला.  

Updated: Aug 18, 2022, 11:10 AM IST
सॅल्युट ! अंत्ययात्रा थांबवून सामूहिक जन गन मन अभियान   title=
संग्रहित छाया

गणेश मोहळे/ वाशिम : National Anthem : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक जन गन मन अभियान राबविण्यात आले. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने आवाहन केलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायनला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, यात विशेष बाब म्हणजे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे चक्क अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईकांकडून अंत्ययात्रेची तिरडी खाली ठेवली आणि राष्ट्रगीत गात राष्ट्रगीताचा सन्मान राखला.

मंगरुळपीर येथील किशोर रामनारायण बाहेती आणि विजय रामनारायण बाहेती याच्या आईचे 16 ऑगस्ट 22 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. काल सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा निघाली.  सकाळी 11 वाजतादरम्यान महाराष्ट्र सरकारने केलेल्या आवाहना नुसार सर्व नातेवाईकांनी तिरडी खाली ठेवत सामूहिक राष्ट्रगीत गायले. 

बाहेती परिवाराच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटे येथे गावातील विवेक कुटे या शेतकऱ्यांच्या  शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वात्रंत्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेतावरिल फवारणीचे  काम थांबवून 11 वाजता राष्ट्रगीत गायले .

तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही सामूहिक जन गन मन या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. मात्र पालघर तालुक्यातील चहाडे येथील एका कुटुंबाने आपल्यावर कोसळलेले दु:ख बाजूला सारुन राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिल्याचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. चहाडे येथील रहिवासी गजानन काशिनाथ पाटील यांच्या पत्नी सुमित्रा पाटील यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. एकाच घरात दुहेरी संकट असताना उत्तरकार्य कार्य थांबवून सामूहिक जन गन मन अभियान राबविले.