एकाच घरात दुहेरी संकट, तरी उत्तरकार्य कार्य थांबवून राबविले सामूहिक जन गन मन अभियान

पालघरमधील चहाडे गावातील हा प्रसंग पुढे आला तेव्हा सगळ्यांनीच त्याचं कौतूक केलं.

Updated: Aug 17, 2022, 09:35 PM IST
एकाच घरात दुहेरी संकट, तरी उत्तरकार्य कार्य थांबवून राबविले सामूहिक जन गन मन अभियान title=

पालघर : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज राज्यभरात सामूहिक जन गन मन अभियान राबविण्यात आले. पालघर जिल्ह्यातही या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. मात्र पालघर तालुक्यातील चहाडे येथील एका कुटुंबाने आपल्यावर कोसळलेले दु:ख बाजूला सारुन राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिल्याचे अनोखे चित्र पहायला मिळाले.

चहाडे येथील रहिवासी गजानन काशिनाथ पाटील यांच्या पत्नी कै. सुमित्रा पाटील यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाला आठवडाही उलटला नसताना स्वाती (बंटी) नरोत्तम पाटील (वय 35) या गजानन पाटील यांच्या नातीचेही अचानक निधन झाले. एकाच घरात असे दुःखाचे दुहेरी संकट आल्यामुळे पाटील कुटुंबियांना उत्तरकार्याबाबत योग्य निर्णय घेता आला नाही. त्यांनी दोघींचेही उत्तरकार्य आज, बुधवारी चहाडे येथे राहत्या घरी व सूर्यानदीच्या मासवण बंधार्‍यावर ठेवले होते.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, ते देशवासीयांत वृद्धींगत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने आज सकाळी 11 वाजता सामूहिक जन गन मन अभियान राबविले. नेमक्या याच वेळेत सूर्यानदीच्या तीरी मासवण बंधार्‍यावर पाटील कुटूंबियांकडून उत्तरकार्याची विधी सुरू होती. 

विशेष म्हणजे पाटील कुटूंबियांनी ते थांबऊन सुख आणि दुःख आपलंच समजून उत्तरकार्याला क्षणभर विश्रांती दिली व प्रथम प्राधान्य राष्ट्राला दिले. यावेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेळेत राष्ट्रगीत घेतले आणि नंतर उत्तरकार्य पूर्ण केले. पाटील कुटूंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले असताना त्यांनी आपल्या राष्ट्राप्रती दाखवलेल्या आदराबद्दल पालघर जिल्ह्यासह राज्यभर त्यांचे कौतूक होत आहे.