ऑक्सिजन गळतीनं 22 रुग्णांचा जीव गेलेलं रुग्णालय पुन्हा चर्चेत, कर्मचारी फुल नशेत

रुग्ण वाऱ्यावर, कर्मचारी झिंगाट... यांच्यावर कारवाई होणार का?

Updated: Apr 29, 2022, 05:00 PM IST
ऑक्सिजन गळतीनं 22 रुग्णांचा जीव गेलेलं रुग्णालय पुन्हा चर्चेत,  कर्मचारी फुल नशेत title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (dr zakir hussain hospital) ऑक्सिजनच्या (Oxygen) टँकमध्ये गळती झाल्याची घटना कोरोना काळात घडली होती. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा असताना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्देवी घटना घडली होती.

नाशिकमधलं तेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नाशिक महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडून कर्मचारी चक्क दारु पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल असतानाही चक्क चित्रपटाच्या शुटिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारचे फोटोही समोर आले आहेत.

रात्रीच्या वेळी कर्मचारी रुग्णांना वाऱ्यावर सोडून इमर्जन्सी वॉर्डमध्ये दारू पीत बसले होते. रात्री अकरा ते चारपर्यंत चालणाऱ्या या शूटिंगमुळे रुग्णांना आवाजाचा आणि गोंधळाचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. एका बाजूला चित्रपट शूटिंगचा गोंधळ तर दुसऱ्या बाजूला दारू पार्टी करत कर्मचाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा केल्याचा समोर आला आहे.

रुग्णालयातील काही कर्मचारी चित्रपटाचं शूटिंग बघण्यात व्यस्त होते, तर काही कर्मचाऱ्यांची दारू पार्टी रंगली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, तक्रारी आल्यानंतर रुग्णालयातील CCTV तपासून कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असं रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितलं आहे.