चेतन कोळस,झी मीडिया, नाशिक : येवला तालुक्यातील पुर्वेकडच्या भागात पावसानं बगल दिल्यामुळं शेतकरी हवालदिलं झालायं. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. जुन महिन्यात सुरुवातील दमदार पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र आता परिस्थिती गंभीर बनलीय. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळं येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. जमिनीवर आलेले पिकाचे कोंब पाण्याअभावी करपूण जाण्याची शक्यता निर्माण झालीयं.
त्यामुळं पीक कसं वाचवायचं असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे. खरं तर येवला तालुक्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला . मात्र पुर्वेकडील भागामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळं कपाशी आणि मका ही पीकं धोक्यात आली आहेत. पावसाची उघडीप आणि त्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळं त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होवू लागला आहे.जून महिन्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र आता बिकट परिस्थिती निर्माण झालीय. पावसानं दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडं लागल्या असून लवकरात लवकर पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट कोसळणार आहे.