नाशिकमधील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; सासऱ्यांनीच सुनेला कायमचे संपवले, कारण...

Nashik Murder Case Solved: नाशिक येथे सोमवारी झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याचं समोर आलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 28, 2023, 11:37 AM IST
 नाशिकमधील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; सासऱ्यांनीच सुनेला कायमचे संपवले, कारण...  title=
Nashik women murder mystery solved in 48 hrs police held accused

नाशिकः सातपूर येथील परप्रांतीय महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून कुटुंबातील सदस्यानेच महिलेचा खून केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेला संपवले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (Nashik Women Murder Mystery)

नाशिकच्या सातपूर येथील विधाते मळा या परिसरात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणात सातपूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी चक्रे फिरवत काही तासाच्या आत संशयितांना अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करताच आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. 

परप्रांतीय महिलेचा खून

गावाकडील जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने चुलत सासऱ्यानेच आपल्या चुलत सुनेचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मूळच्या मध्य प्रदेश आणि सध्या सातपुर येथे राहणाऱ्या अशोक्तीबाई शनीदयाल बैगा या परप्रांतीय महिलेची सोमवारी सकाळी हत्या झाली होती. सोमवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक्तीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यामुळं परिसरात एकच खळबळ माजली होती.

तीनच दिवसांपूर्वी झाले होते स्थायिक

तीनच दिवसांपूर्वी या परिसरात राहायला आलेल्या या बैग कुटुंबीयांबद्दल जास्त माहिती नसल्याने खुनाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान सातपूर पोलिसांसमोर होते. पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत काही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी जयकुमार परसराम बैग याने खुनाची कबुली दिली. खून करण्यात आलेली महिला संशयित आरोपीची चुलत सून असून गावाकडे त्यांचा जमिनीवरून वाद सुरू होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

हत्येची दिली कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाकडे भांडण करून नुकतेच बैग कुटुंब सातपूरला आले होते. सोमवारी सकाळी संशयित आरोपी आपल्या चुलत सुनेला जमिनीच्या वादावरून विचारणा करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.  नंतर भांडण इतके विकोपाला गेले की रागाच्या भरात चुलत सासर्‍याने महिलेच्याच स्वयंपाक घरातील सुरीने चुलत सुनेचा गळा चिरला आणि नंतर तिथून पोबारा केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने हत्येची कबूली दिली आहे.