आधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.

Updated: Apr 28, 2024, 08:31 PM IST
आधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? title=
Kolhapur Heir

Kolhapur Politics: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद उफाळून आलाय.. गादीच्या ख-या वारसदाराचा हा वाद आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज, तर महायुतीकडून संजय मंडलिक अशी लढत रंगलीय. मंडलिकांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात सभा घेतली. तेव्हा मविआनं त्याला गादी विरुदध मोदी असा रंग दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनं मोठी राजकीय खेळी खेळलीय. राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांना मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलंय. कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.

उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनीही छत्रपती शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. आताचे कोल्हापूरचे महाराज खरे वारसदार नाहीत, असा दावा त्यांनी चंदगड नेसरीतल्या जाहीर सभेत केला होता.मंडलिकांच्या या वक्तव्याला आता राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडेंनीही दुजोरा दिलाय. यानिमित्तानं कोल्हापूर गादीच्या वारसाचा जुना वाद पुन्हा ऐरणीवर आलाय... तो वाद नेमका काय होता, ते समजून घेऊया. 

1962 मध्ये कोल्हापूर संस्थानचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराजांनी कन्येच्या चिरंजीवांना दत्तक घेतले. कन्या शालिनीराजेंचा विवाह नागपूरचे राजे राजारामसिंह यांच्याशी झाला होता. दिलीपसिंह असं त्यांच्या चिरंजीवांचं मूळ नाव होतं. दत्तक विधानानंतर त्यांचं 'छत्रपती शाहू महाराज' असं नामकरण झालं.

'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा आरोप 

मात्र या दत्तकविधानाला कोल्हापूरकर जनतेनं विरोध केला होता. राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजेंच्या चिरंजीवांना दत्तक घ्यावं, अशी जनभावना होती. तेच चिरंजीव म्हणजे धुळ्याचे राजवर्धनसिंह कदमबांडे ते धुळ्याचे माजी आमदार आहेत. 1984 मध्ये त्यांनी इचलकरंजीमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती.

मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही जुनी खपली पुन्हा निघालीय. शाहू महाराज विरुद्ध मंडलिक या राजकीय सामन्याला आता शाहू महाराज विरुद्ध राजवर्धनसिंह कदमबांडे असं वळण लागलंय. गादी विरुद्ध गादी असा नवा संघर्ष कोल्हापुरात रंगू लागलाय. मान गादीला असं गर्वानं सांगणारे कोल्हापूरकर नेमकं कोणत्या गादीला मान देतात आणि कुणाला मत देतात, यासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह..' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत