नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त, अपघाताचं प्रमाणही वाढलं

कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दिसणारे चकाचक रस्ते आता खड्ड्यात गेलेत. 

Updated: Aug 5, 2017, 09:25 PM IST
नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त, अपघाताचं प्रमाणही वाढलं title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया,  नाशिक : कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दिसणारे चकाचक रस्ते आता खड्ड्यात गेलेत. शहराच्या सर्वच भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांचं जाळं आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण तर वाढलंच आहे, शिवाय पाठदुखीसारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतंय. 

नाशिक शहराच्या सिडको सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, पश्चिम अशा सर्वच विभागांत रस्तवर खड्ड्यांचं जाळ आहे. द्वारका चौक, नाशिक पुणे रोडही त्याला अपवाद राहिला नसून, खड्ड्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडत असल्यानं वाहनचालकांना पाठदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागतोय. म्हणूनच महापालिकेवर दावा ठोकण्याचा तयारीत काही वाहन चालक आहेत. 

पालिका प्रशासनानं तत्काळ रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी नागरिकांकडून होतेय. गेल्या आठ दहा दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू होता त्यामुळे खड्डे बुजविता आले नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांत खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु झालं असून, 

 805 खड्डे मुरुमानं, मुख्य रत्स्यांवरचे 147 खड्डे कोल्डमिक्सनं तर 299 रस्ते डांबरीकरणाच्या माध्यमातून पालिक प्रशासनानं बुजवले आहेत. तर कुंभमेळा काळात बनविलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती तीन वर्षासाठी ठेकेदाराकडे असल्याने त्यांच्या माध्यमातून नव्या रस्त्यांवरचे खड्डे बुजविले जाताहेत. 

 दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडतात,  रस्ते बांधणीसाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च होतो, तसंच श्रेयवादाची लढाईही होते. खड्डे बुजवण्यासाठी 1 ते दीड कोटी रुपये खर्च केले जातात मात्र परिस्थिती सुधारत नाही. अधिकारी बदलतात, सत्ताधारीही बदलतात, मात्र ही यंत्रणा कधी बदलणार असा प्रश्न उपस्थित होत असून, शहरात एखादा बळी जाण्याच्या आधी रस्ते चांगले करावेत अशी मागणी नाशिककर करताहेत.