प्रसादाच्या नावाखालीही फसवणूक! त्र्यंबकेश्वरमध्ये विकला जातोय भेसळयुक्त पेढा

Trimbakeshwar News : प्रसादाचा पेढा खात आहे सावधान दुधापासून बनला आहे का याची खात्री करून घ्या. कारण त्र्यंबकेश्वरमध्ये एका विक्रेत्याकडे विना दुधाचे प्रसादाचे पेढे अन्न व औषध प्रशासनाला सापडले आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 8, 2023, 08:46 AM IST
प्रसादाच्या नावाखालीही फसवणूक! त्र्यंबकेश्वरमध्ये विकला जातोय भेसळयुक्त पेढा title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मंदिराच्या बाहेर प्रसादासाठी विकले जाणारे पेढे प्रसाद म्हणून आपण विकत घेणार असाल तर सावधान. कारण तुम्हाला विकण्यात येत असलेले मलाई पेढे (Milk Pedha) हे दुधातील नसल्याचे समोर आलं आहे. दुधात न बनवता हे पेढे दुधाचेच असल्याचे सांगत तुमच्या माथी मारले जात आहेत. नाशिक मध्ये आणि औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) टाकलेल्या छाप्यामध्ये याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

श्रावणी सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भीमाशंकर मंदिर परिसरात हे मलाई पेढे विकले जात होते. पांढरे स्वच्छ जणू काही दुधापासून बनवलेल्या मलईचे वाटावेत असे हे पेढे विक्रिला होते. मात्र हे पेढे दुधापासून व दुधाच्या मलई पासून नव्हे तर गुजरातमधून विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाइट अनलॉग नावाच्या अन्न पदार्थापासून तयार केल्याचे समोर आले आहे. हा पदार्थ दुधाची स्कीम पावडर आणि पाम तेलापासून बनवला जात असल्याचे समोर आलं आहे. नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वर परिसरातून 3200 रुपयांचे पेढे नष्ट करून सुमारे 14 हजार रुपये किमतीच्या डिलाईट स्वीट अनलॉगच्या 8 पिशव्या जप्त केल्या आहेत.

या मलई पेढ्यांची विक्री करणाऱ्याकडे अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मानक कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवानाही उपलब्ध नसल्याचा आढळून आलं आहे. त्यामुळे नाशवंत असलेले हे पेढे जागीच नष्ट करण्यात आले. कुठल्याही मंदिराच्या बाहेर आपण सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे पेढे लहान मुलांसह मोठ्यांनाही आकर्षित करत असतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी आपसूकच त्याकडे पावले वळतात. मात्र हे पेढे तुमच्या जीविताला धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे असे उघड्यावरचे पेढे विकत घेताना काळजी घेण्याचे आवाहन आणि औषध प्रशासनाने केले आहे.

पेढे विकत घेताना काय घ्यावी काळजी?

पेढे उघड्यावरील दुकानातून घेऊ नयेत

प्रसिद्ध खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातून पेढे घ्यावेत

पेढे घेताना एक्सपायरी डेट तसेच तारखेसह आपल्या नावाने बिल घ्यावे

तसेच बाजारात कंदी पेढे, मलाई बर्फी, मलाई पेढे तसेच मलाई केक नावाने विविध पदार्थ विकले जात आहेत. हे पेढे दुधापासून बनवले आहेत की नाही याची खात्री जमा करून घ्यावी. एक किलो दुधापासून बनवण्यात आलेले पेढे 500 ते 700 रुपये किलोने मिळतात. त्यामुळे 200 ते 300 रुपये  किलोने मिळणाऱ्या पेढ्यांबाबत ग्राहकांनी  साशंक असायला हवे. तसेच यापुढे कुठल्याही तीर्थक्षेत्री व मंदिराच्या बाहेर असा गोड मलईदार पेढ्याचा प्रसाद घेणार असाल तर एकदा नक्की विचार करा.

"त्रंब्यकेश्वर येथे अन्न व औषध प्रशासनाचे पथक तपासणी करत असताना त्यांना परराज्यातून आलेल्या मिठाईचे बॉक्स सापडले. त्याचा विक्रेता हे बॉक्स मलाई पेढा म्हणून विक्री करत होता. त्यामध्ये मलाई असणे अपेक्षित होते. पण त्यात तसे काही नव्हते म्हणून आमच्या विभागाने आठ किलो पेढे जप्त करुन नष्ट केले," अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त विवेक पाटील यांनी दिली.