धरणाच्या बाजूला असलेल्या शाळेतच पाणी नाही; सुट्टी देत शासकीय शाळेचा अजब फतवा

Nashik News : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.सरकारी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधात उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे धरणाशेजारीच शाळा असून देखील पाणी उपलब्ध नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आकाश नेटके | Updated: Jun 30, 2023, 03:12 PM IST
धरणाच्या बाजूला असलेल्या शाळेतच पाणी नाही; सुट्टी देत शासकीय शाळेचा अजब फतवा title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या नाशिक (Nashi News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाणी नाही म्हणून शाळेने विद्यार्थ्यांना सुट्टीच देऊन टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय करण्याऐवजी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना थेट सुट्टीच देऊन टाकल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धरणाशेजारीच असलेल्या शाळेतच हा सगळा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष्य आहे.

वैतरणा धरणाच्या बाजूला असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव या आश्रम शाळेत पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही म्हणून चक्क पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे गेल्या आठ दिवसापासून आश्रम शाळा सुरू झालेली नाही. देवगावात आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रम शाळा असून यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या फक्त मुली शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेत पाणी नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने सुट्टी दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या आश्रम शाळेला वैतरणा धरणातून स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे. मात्र धरणाचा साठा कमी झाल्यामुळे विहीरत पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पाणी सर्व मुलींना पुरणार नाही असे कारण सांगत शिक्षकांनी परस्पर सुट्टी उपभोगण्याचा प्रकार केला आहे. मात्र दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग चालू ठेवून मनमानी कारभार सुरू आहे.

वैतरणा धरणातून प्रामुख्याने मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या ठिकाणी आदिवासी मुली शिक्षण घेतात त्या ठिकाणीच पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे शाळाच बंद करून सर्व मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आश्रम शाळेतील मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

"त्रंब्यकेश्वर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी ही आश्रम शाळा आहे. ही संपूर्ण शाळा मुलींची आहे. शाळेत पाणी पुरवठा व्हावा यासाठी लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना आखण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र विहिरीला पाणी नाही हे कारण देत शाळा बंद ठेवण्यात आली असून सर्व विद्यार्थिनींना घरी पाठवण्यात आले आहे. पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी सुट्टी देणे हे निंदनीय आहे," असे नागरिकांकडून म्हटलं जात आहे.