योगेश खरे झी 24 तास नाशिक : बातमी आहे हनुमान जन्मस्थळाच्या वादाची. हनुमानाच्या जन्मस्थळावरून पेटलेला वाद चांगलाच विकोपाला गेलाय. नाशिकमध्ये पार पडलेल्या शास्त्रार्थ सभेत वातावरण मुद्यावरून गुद्यावर आलं. गोविंदानंद आणि नाशिकच्या महंतांमध्ये यावेळी कसा जोरदार राडा झाला, पाहूयात हा खास रिपोर्ट. (nashik mahant and govind maharaj controversy know what exactly matter)
स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणारे हे साधू, महंत आपापसात लढतायेत. माफीसाठी थयथयाट करत थेट शुक्राचार्यांचा अवतार धारण करणारे हे आहेत गोविंदानंद सरस्वती. त्यांनीच किष्किंधा हे हनुमान जन्मस्थळ असल्याचा दावा करत नसता वाद उकरून काढला.
मात्र त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचं सांगत, नाशिकमधल्या महंतांनी त्यांचा दावा फेटाळला. याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये मंगळवारी शास्त्रार्थ सभा भरली. पण धर्मपंडितांच्या सभेत वादावर तोडगा निघण्याऐवजी साधू-महंत एकमेकांना भिडले.
शंकराचार्यांचा अपमान केला असा आरोप करत गोविदांनंदांनी नाशितमधल्या महंतांना धारेवर धरलं. माफीसाठी त्यांनी अक्षरश: थयथयाट सुरू केला.
त्यामुळे संतापलेल्या महतांनी त्यांच्यावर चक्क माईकच उगारला. गोविदांनंद हेच खोटारडे आहेत त्यामुळे माफीचा प्रश्नच येत नाही असा आरोप महंतांनी केलाय.
विशेष म्हणजे शास्त्रार्थ सभा सुरू होण्यापूर्वी वादाची ठिणगी पडली ती बसण्याच्या जागेवरून... सभेत स्वामी गोविंदानंद वरच्या आसनावर जाऊन बसले. त्यामुळं इतर साधू, महतांचा पारा चढला. अखेर हा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली.
हनुमान जन्मस्थळ वादाचा एक आर्थिक अँगलही समोर आलाय. केंद्र सरकारचा निधी लाटण्यासाठीच ही मोहीम सुरू असल्याचा आरोपही महंतांनी केलाय.
धार्मिक वाद तसे आपल्यासाठी नवीन नाहीत. मात्र साधू, महंतच असा श्रद्धेचा बाजार मांडत असतील तर त्यांना धर्मरक्षक मानावं का? ज्यांना धर्मच समजला नाही अशांकडून सामान्यांनी कोणता आदर्श घ्यावा, हाच खरा प्रश्न आहे.