निलेश वाघ, झी २४ तास कळवण : नाशिकच्या कळवण तालुक्यातील धनोली धरणाचे लोखंडी गेट चार समाज कंटकांनी तोडल्याची संतापजनक घटना घडली आहे. आधीच पाणीटंचाई आणि ऐन दुष्काळात 7 ते 8 लाख लिटर पाण्याची नासाडी झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धनोली धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जाऊ लागल्याने शेतकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असता चार जण गेट तोडताना आढळून आले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना पकडून गावाच्या मंदिरात कोंडून ठेवले. गेट तोडणारे हे समाजकंटक दळवट गावचे रहिवाशी आहेत.
प्रमोद बायजी पवार(६०) ,सोनू बंडू गावित (६०), शंकर केवजी चव्हाण (५५) व सुभाष येवाजी पवार ( ६० ) अशी त्यांची नावे आहेत. धनोली धरणात सध्या 15 लाख लिटर पाणीसाठा आहे. त्यापैकी 7 ते 8 लाख लिटर पाणी वाहून गेले पाण्याच्या अचानक आलेल्या प्रवाहामुळे परिसरातील शेताचे आणि पिकांचे नुकसान झाले. दरम्यान या चार समाज कंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पोलीस याठिकाणी ठाण मांडून आहेत. नांदगावच्या साकोरा गावात सूड उगविण्यासाठी विहिरीत विष कालविण्याचा प्रकार समोर आला. तर मनमाडमध्ये 300 लिटर पाणीचोरी झाली. पाणीचोरीचा धसका घेत मनमाडच्या नागरिकांनी पाण्याच्या टाक्या कुलूपबंद करून ठेवल्या आहेत. या घटना ताज्या असताना आता सामाज कंटकांनी धरणाचे गेट तोडून 7 ते 8 लाख लिटर पाण्याची नासाडी केल्याची घटना घटल्याने संताप व्यक्त होत आहे.