सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथा सोहळ्यात चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. नाशिकच्या (Nashik Crime) पाथर्डी गावात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा ( Shiv Mahapuran Katha) सोहळ्याच्या पाच दिवसांत महिलांचे लाखोंचे दागिने लंपास झाले आहेत. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी महिलांना पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 56 महिलांना तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांसमोर (Nashik Police) आता या चोरट्यांचा शोध घेऊन दागिने महिलांना मिळवून देण्याचं आव्हान असणआर आहे.
पाथर्डी गावात कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात 56 महिलांचे तब्बल एक किलो 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे ५२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारत चोरट्यांनी 'दिवाळी'च साजरी केल्याची नागरिकांत चर्चा आहे.
पाथर्डी गावात 21 ते 25 नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत शिवमहापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कथा ऐकण्यासाठी दररोज नाशिक शहर-जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक हजेरी येथे हजेरी लावत होते. त्यात लाखो महिलांचाही समावेश होता. कथा सोहळ्याला येताना सोन्याचे दागिने परिधान करू नये, स्वतःचे दागिने स्वतःच सांभाळावीत असे आयोजन समितीसह पोलिस प्रशासनानेही वारंवार सांगितले होते. असे असतानाही हजारो महिला सोन्याचे दागिने परिधान करून कथा ऐकण्यासाठी येत होत्या. त्याचाच फायदा घेत सोनसाखळी चोरट्यांनी गर्दीत हातसफाई करीत 56 महिलांचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यांमध्ये इतर महिलांना साक्षीदार करण्यात आले आहे. एकूण एक किलो 47 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे इंदिरानगर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या कथेप्रसंगी सुमारे 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता.