4 किलोचा सोन्याचा शर्ट, अंगावर किलोभर सोने... नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक

Nashik News : पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाने त्यांना गिनीज बुकमध्ये स्थान मिळवून दिले होते. पंकज पारख यांनी त्यांच्या वाढदिवशी सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता

Updated: Feb 6, 2023, 05:31 PM IST
4 किलोचा सोन्याचा शर्ट, अंगावर किलोभर सोने... नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक title=
(फोटो सौजन्य - Facebook)

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्याच्या येवला शहरातील 'गोल्डन मॅन पंकज पारख' (pankaj parakh) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पंकज पारख यांनी कै. सुभाषचंद्र पारख पतसंस्थेत २१ कोटी १६ लाखांचा अपहार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्यांना अटक केली आहे. 

कोण आहेत “गोल्डन मॅन पंकज पारख” 

पंकज पारख हे येवला (Yeola) शहरातील रहिवासी आहेत. ते लहानाचे मोठे याच शहरात झाले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी येवला शहरात गारमेंट आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरु केला. यात यश मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1991 साली पंकज पारख येवला नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी येवला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पद सुद्धा सांभाळले. 

“गोल्डन मॅन” नाव कसे पडले

लहानपणापासून पंकज पारख यांना सोन (Gold) वापरण्याची आवड होती. या आकर्षणातून पारख यांनी सोन्याच्या वेगवेगळ्या वस्तू सुद्धा तयार केल्या. गोल्डन वॉच, सोन्याच्या अनेक चेन, अंगठ्या, मोबाईल फोनला सोन्याच कव्हर आणि चष्म्याला सोन्याची फ्रेम अश्या अनेक सोन्याच्या वस्तू पारख वापरत असत. यामुळे पारख यांना येवला शहरतील नागरिक “गोल्डन मॅन” (Golden Man) म्हणून ओळखतात. मात्र सोन्याच्या शर्ट मुळे त्यांना संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली. वाढदिवसाकरिता (Birthday) २०१६ साली पारख यांनी चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. याची किंमत साधारण एक कोटी 11 लाख 92 हजार रुपये होती. या शर्टमुळे शरीरभर सोन्याचा मुलामा चढल्याचा भास होत होता. त्यावेळी पारख यांचे नाव “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स” मध्ये नोंदवले गेले. 

या कारणासाठी पंकज पारखला झाली अटक

पंकज पारख येवला शहरातील कै. सुभाषचंद्र पारख पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत. संस्थेत गैरव्यवहार (Fraud) झाला असल्याचा आरोप पतसंस्थेच्या ठेवीदारांनी केल्यानंतर बँकेचे संचालक मंडळ 26 ऑगस्ट 2021 साली बरखास्त करण्यात आले. यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. प्रशासकाने केलेल्या चौकशीत पतसंस्थेत 21 कोटी 96 लाख 99 हजार 850 रुपयांचा अपहार झाला असल्याच सिद्ध झाल्या नंतर प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा 17 संचालकांविरुद्ध 22 नोव्हेबर 2021 रोजी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांची अस्ते कदम भूमिका 

कै. सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालकांविरूढ नोव्हेबर 2021 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तब्बल एक वर्षानंतर संशयित आरोपींना अटक झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींना अटक करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी का लागला याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. इतर संचालक आरोपींचे काय असा नागरिक करत आहेत. 

न्यायालयाने सुनावली दहा दिवसांची पोलीस कोठडी 

पंकज पारखला आज निफाडच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पारख यांच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पंकज पारख यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.