मोठी बातमी! कातकरी समाजातील मुलांची होतेय विक्री, नाशिकमध्ये टोळीचा पर्दाफाश

कातकरी समाजच्या गरीबीचा फायदा घेऊन लहान मुलांचा होतेय विक्री

Updated: Sep 8, 2022, 07:33 PM IST
मोठी बातमी! कातकरी समाजातील मुलांची होतेय विक्री, नाशिकमध्ये टोळीचा पर्दाफाश title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : सह्याद्रीच्या (Sahyadri) दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या कातकरी कुटुंबातील (katkari tribe) मुलं अवघ्या पाच हजार रुपयात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेंढपाळांनी मेंढ्या चारण्यासाठी अशा लहान मुलांचा वापर केला जात आहे. इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे ही टोळी उघडकीस आली आहे. गेल्या तीन वर्षात जवळपास तीस मुलांची विक्री झाल्याचं वास्तव श्रमजीवी संघटनेने समोर आणला आहे. यातील सहा मुलं सापडली असून 24 मुलं अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणांमध्ये घोटी अकोले घुलेवाडी या तीन पोलीस स्टेशनमध्ये वेठबिगारी बालमजुरी आणि ॲट्रॉसिटी कायदा खाली चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी कांतीलाल करांडे हा फरार असून विकास कुदनर याला नगर जिल्ह्यातील अकोले पोलिसांनी अटक केली

कोण होती गौरी
अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेली गौरी कातकरी समाजातील. मिळेल तिथे झोपड्या टाकून वीट भट्टी, खडी फोडणे, मासेमारी करून उदरनिर्वाह करणे, अशा विविध कामांद्वारे ही लोकं आपली गुजराण करतात. उभाडे गावात राहणाऱ्या गौरीला अवघ्या तीन हजार रुपयासाठी तिच्या आईने संगमनेरच्या विकास सिताराम कुदनर याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी सोपवलं.  गौरीची आई तुळशीबाई सुरेश आगिवले इगतपुरी तालुक्यातील वीट भट्टी वर काम करून आपली गुजरात करते.

त्या पैशातून तिचं कर्ज फेडले जाणार होतं आणि घरातील काही कामांनाही मदत मिळणार होती. आपल्या पोटच्या गोळ्याला देताना तिला वेदना झाल्या पण परिस्थिती अधिकच विपरीत बनली होती. गेल्या आठवड्यात विकासने गौरीला काम करत नाही म्हणून मार मार मारलं.  त्यामुळे तिची तब्येत अचानक खालावली. ती बेशुद्ध अवस्थेत गेल्यामुळे विकास आणि त्याच्या साथीदारांनी तिला उबाळे गावातील तिच्या झोपडी समोर लाल चादरीमध्ये मध्यरात्री आणून टाकलं. सकाळी आईने आपल्या मुलीची अवस्था बघताच हंबरडा फोडला. तिला वाचवण्याची शर्त सुरू झाली घोटी इथल्या ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. 

घटनेचा झाला उलगडा
गेल्या तीन वर्षांपूर्वी अशाच एका मुलीचा मृत्यू झाल्याने खोटी इथल्या श्रमजीवी संघटना (shramjivi sanghatana) या घटनेबाबत लक्ष ठेवून होती कातकरी समाजात होणारं लहान मुलांचे शोषण त्यांच्या लक्षात होतं. गौरीची घटना समोर येताच  संघटनेने तिला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. पण उपचारादरम्यान गौरीचा ही मृत्यू झाला. आता हे कायमस्वरूपी थांबावं यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी होणाऱ्या या शारीरिक शोषणाची माहिती माध्यमापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे गौरी सारख्या अनेक लहान मुले मुली गेल्या तीन वर्षात याच पद्धतीने वेठबिगारीसाठी वापरली गेल्याचा समोर आलं.

पोलिसांनी केली कारवाई
श्रमजीवी संघटनेने याबाबतची माहिती देताच या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील अकोले आणि घुलेवाडी इथं गुन्हे दाखल करण्यात आले तसंच नाशिक जिल्ह्यातील घोटी इथल्या पोलीस स्टेशनमध्ये बालमजुरी ॲट्रॉसिटी कायदा आणि वेठबिगारी अंतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारू पाजून आदिवासींकडून मुले खरेदी करणारा एजंट कांतीलाल करंडे सध्या फरार आहे. मात्र मुले खरेदी करणाऱ्यांपैकी एक असलेला विकास कुदनर याला अकोले पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील सहा मुले खरेदी केल्याचं समोर आलं आहे