सोनू भिडे, झी 24 मीडिया, नाशिक: नाशिकच्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीच्या वसतिगृहात आत्महत्या केली. यामुळे वसतिगृह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वरद नेरकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मूळचा नाशिक येथे राहणारा वरद दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याने स्वत:चे आयुष्य संपवम्याचा दुर्देवी निर्णय घेतला. प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते निष्कर्ष निघत नसल्याने वरद मानसिक तणावात होता. यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दिल्लीच्या किशनगंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरी वरदने आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.
गुरुवारी सकाळी वरद प्रोजेक्ट च्या कामासाठी प्रयोगशाळेत गेला होता. अपेक्षित निष्कर्ष न आल्याने मार्गदर्शकांकडून त्याला बोलणे ऐकावी लागली. प्रोजेक्टमध्ये आवश्यक ते निष्कर्ष निघत नसल्याने वरद मानसिक तणावात होता, असे सांगितले जात आहे. मार्गदर्शकांची बोलणी ऐकल्यानंतर तो वसतिगृहाकडे परतला.
या दरम्यान त्याने कुटुंबियांशी त्याचे फोनवर बोलणे झाले. सायंकाळी पालकांनी चौकशी करण्यासाठी वरदला फोन केला. पण समोरुन कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. वरदच्या पालकांनी त्याच्या मित्राला फोन केला असता वरदने आत्महत्या केल्याचे समोर आले.
वरदचे वडील संजय नेरकर हे नाशिक महानगर पालिकेच्या सेवेत आहेत तर आई गृहिणी आहे. वरदचा लहान भाऊ अथर्व हा जळगाव येथे बी. टेकचे शिक्षण घेत आहे. वरदने नाशिकमधील आदर्श शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असलेल्या दिल्ली आयआयटीत वरदला एम टेक करायचे होते. आणि अथक प्रयत्न करून त्याने प्रवेश मिळवला सुद्धा. 2022 पासून तो दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे हे शेवटचे वर्ष होते. त्याची मोठ्या कंपनीत निवडही झाली होती. दोन महिन्यात त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो जूनमध्ये रुजू होणार होता. असे असताना त्याने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.