योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात नाशिकमध्ये (Nashik) अंधश्रद्धेचा कळस गाठणारी घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात शिक्षकही अंधश्रद्धेला खतपाणी घालत चित्र पाहायला मिळाले होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव इथं शासकीय कन्या आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मागील आठवड्यात वृक्षारोपणाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच शाळेत वृक्षारोपन करु न दिल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली होती.
या विद्यार्थिनीला मासिक पाळी आली असल्याने ते वृक्षारोपण्याचा आरोप तिने केला होता. तू झाड लावू नकोस, कारण झाड जगणार नाही, असं सांगत शिक्षकाने त्या मुलीला झाड लावू दिलं नाही. सर्व मुलींच्या समरो शिक्षकाने त्या मुलीला झाड लावण्यापासून रोखलं होतं.
पण आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. मुलीने तक्रार केल्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणावरुन या शिक्षकांवर टीका करण्यात येत होती. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत सखोल चौकशी केली आहे.
या प्रकरणी आता तक्रार करणारी मुलगी त्या दिवशी गैरहजर असल्याचा अहवाल प्रशासन दिला आहे. मासिक पाळी आल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपणापासून रोखलं होतं असा तिचा आरोप होता. तिच्या वर्गातील काही विद्यार्थिनींनी सुद्धा याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, सध्या तरी संबधित शिक्षकाचे निलंबन टळलेले असले तरी या सर्व घटनेमध्ये आदिवासी विद्यार्थिनीने असे आरोप का केलेत याविषयीची सखोल चौकशी सुरू आहे