पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकरने दिलीय. सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर करण्यात आला. एक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरेच्या साथीने गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचं सीबीआयने न्यायालयात म्हटलंय. आता यावर ५ जुलैला न्यायालय निर्णय देणार आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचंही नाव घेतलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात २५ मे रोजी वकील संजीव पुनाळेकरांनाही सीबीआयनं अटक केली होती. रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुनाळेकर यांनीच आपल्याला दाभोलकर हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, अशी कबुली शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिलीय.