प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदूरबार : नंदूरबार लोकसभा मतदार संघ. याच मतदार संघात राज्यातला पहिला मतदार राहतो आणि याच जिल्ह्यातून काँग्रेस देशात निवडणूक प्रचाराला सुरुवात करत असे, अशा या मतदारसंघात मोदी लाट आणि त्याला डॉ विजयकुमार गावितांची साथ मिळाल्यानं कमळ फुललं. आता काय आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती. पाहुया हा लेखाजोखा.
नंदुरबार जिल्ह्यात ६७ टक्के आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे. या जिल्ह्यातले सहाही तालुके आदिवासी बहुल आणि चार विधासभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत. सलग नऊ वेळा काँग्रेसचे माणिकराव गावित या मतदार संघाचे अनभिषिक्त खासदार होते..... २०१४ ला त्यांना सर्वाधिक वेळा खासदार बनण्याची संधी होती, ही संधी मात्र मोदी लाटेने हिरावून घेतली.
ऐन वेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी भाजपाला अनुकूलता दाखवत त्यांची मुलगी डॉ हीन गावित यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळवलून दिली. मोदींचा करिष्मा आणि डॉ गावितांचं संघटन या जोरावर डॉ हीना यांनी नऊ वेळा खासदार असलेल्या माणिकरावांना एक लाख सहा हजार ९०५ मतांनी धूळ चारली.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार आणि शहादा विधानसभेत भाजप विजयी झाली. तर साक्री, शिरपूर, नवापूर आणि अक्राणी या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा झेंडा आहे. शहादा आणि तळोदा पालिका भाजपच्या ताब्यात आहेत.
नवापूर पालिकेची जबाबदारी तर खुद्द खासदार डॉ हीना गावित यांच्यावर असताना याठिकाणी एकही जागा भाजपच्या हाती लागली नाही. अंतर्गत कलह हाही भाजपसमोरचा आव्हानाचा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकी आधी भाजपचं जिल्हाध्यक्षपद असलेल्या खासदार डॉ हीना गावित यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय. त्यामुळे डॉ हीना आणि भाजपचे नंदुरबार जिल्यातल्या भविष्य या निवडणुकीत ठरणार आहे.
जिल्हाध्यक्ष असताना डॉ हीना यांना त्यांच्याच पक्षातल्या आमदार उदेसिंग पाडविनाच्या विरोधाचा सामना करावा लागतो. त्यात भरीस भर म्हणजे डॉ हीना गावित यांचे वडील डॉ विजयकुमार गावित आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने त्यांच्यासोबत राष्टवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही भाजपमध्ये आले.
भाजपचे मूळ कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले कार्यकर्ते यांचं काही नीट जमत नाही. खासदार डॉ हीना यांची खासदार म्हणून निवडणून येण्याची ही पहिलीच वेळ. तरुण खासदार म्हणून यांची ओळख आहे. भाजपामधल्या अंतर्गत लाथाळ्यांचा सामना करताना त्यांना काँग्रेसमधल्या दिग्गजांशीही त्यांना दोन हात करायचेत.