नांदेड : नांदेड पोलीस भरतील भ्रष्टाचार प्रकरणी आरोपींकडून २० लाख रुपये जप्त करण्यात आलेत. लेखी परीक्षेत गुण वाढण्यासाठी हे पैसे घेण्यात आले होते. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. मात्र, मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अजूनही फरार आहेत. लेखी परिक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सांगली इथल्या ज्या एस.एस.जी कंपनीला देण्यात आले होते त्या कंपनीने ओएमआर स्कॅनिंगच्या वेळी काही परीक्षार्थींचे गुण वाढवून दिले होते. प्रत्येकी साडे सात लाख रुपये घेऊन गुण वाढवून दिले जायचे. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी मध्यस्थाचे काम करायचे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक केलीय.
अत्यंत हुशारीने करण्यात येणाऱ्या हेराफेरीचा नांदेडचे पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पर्दाफाश केलाय. चंद्रकिशोर मीना हे २००७ बॅचचे आयपीएस अधिकारी... नांदेडमध्ये ३१ मार्च २०१८ रोजी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा झाली होती. ओएमआर स्कैनिंग पध्दतीने उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या... सांगलीच्या एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीला उत्तरपत्रिका तपासनीचे काम देण्यात आले होते... पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी प्रश्नपत्रिका सेट केली होती.. निकाल लागला त्यात १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले होते... पण १३ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाल्याने मीना अचंबित झाले.
आयपीएस अधिकारी असलेल्या मीना यांनी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही अवघड जातील, असे काही गणिताचे प्रश्न टाकले होते... संशय आल्याने मीना यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले ते विद्यार्थी दीड तासाच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका सोडवण्यात व्यस्त असताना दिसले नाही. तेव्हा या विद्यार्थ्यांना एव्हढे गुण कसे मिळाले याचा तपास पोलिसांनी केला आणि ओएमआर स्कॅनिंगची हेराफेरी उघड झाली.
ओएमआर पद्धतीने पेपर तपासनीचे काम राज्यात साधारणता २०१० पासून सुरु आहे. उत्तरपत्रिकावरील मार्क रीडिंग करुण गुण देणाऱ्या या पद्धतीवर कुणालाही संशय येणार नाही. मात्र पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी अत्यंत शिताफीने याचा भांडाफोड केला आणि हा गैरव्यवहार समोर आला. त्यामुळे चंद्रकिशोर मीना यांच्या कुशाग्र बुद्धीला आणि तपासाला सलामच करावा लागेल.