कधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता...

नांदेड हादरलं, सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती

Updated: Jan 23, 2023, 04:22 PM IST
कधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता... title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : कायदे कितीही कठोर केले तरी महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना (violence against women) थांबायचं नाव घेत नाहीत. राज्यात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिसेंच्या (sexual harassment) घटना घडत असतात. नाही मिळालं, तर ओरबाडा, ओरबाडता नाही आलं तर संपवून टाका ही मानसिकताच या घटनांना कारणीभूत ठरतेय. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने नांदेड (Nanded) हादरलंय. 

काय आहे नेमकी घटना?
तरुणाकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगांव इथली ही संतापजनक घटना आहे. 20 वर्षीय ऋतुजा शिंदे असे मयत तरुणीचे नाव आहे. गावातील आरोपी उद्धव शिंदे हा तिची नेहमी छेडछाड काढत होता. येता-जाता ऋजुता पाहून अश्लिल शेरेबाजी आणि हावभाव करत होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला ऋजुता कंटाळली होती. याबबात तीने आपल्या कुटुंबाला माहिती दिली होती. त्यांनी आरोपीच्या आई-वडिलांनी ही गोष्ट सांगत समज देण्याचं सांगितलं.

छेड काढणारा आरोपी आणि मयत तरुणी एकाच गावातील आहेत. आरोपी छेडछाड करण्यासोबतच अश्लील कॉमेंट करत होता. आरोपी सतत त्रास देत असल्याने मुलीने आपल्या आईवडिलांना ही बाब सांगितली. गावातील मामला असल्याने आईवडिलांनी आरोपीच्या आईवडीलांना सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट आरोपी उद्धव शिंदे तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने ऋजुताला जास्तच त्रास द्यायला सुरुवात केली. गावात याची सगळीकडे वाच्यता झाल्याने ऋजुताने अखेर स्वतःच जीवन संपवलं.

हे ही वाचा : 'तुमचा दाभोलकर करु...' अंनिसचे श्याम मानव यांना धमकीचा फोन

शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर
आरोपी हा मृत मुलीला वारंवार त्रास देत होता. मुलीच्या कुटुंबियांनी सांगितल्यानंतरही त्याचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे ऋजुताने टोकाचं पाऊल उचललं.  घटनेनंतर आरोपी उद्धव फरार झालाय. ऋजुताच्या मृत्यूने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.