नागपूर : नागपुरात मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याबाहेर "उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री" अशी सोनेरी अक्षराने लिहिलेली पाटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रशासनानं हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध ठिकाणी रंगरंगोटी केली जात आहे. महत्त्वाच्या पदावरील नेत्यांच्या नावाच्या पाट्या नव्याने रंगवल्या जात आहेत.
रामगिरी बंगल्याबाहेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पांढरी पाटी काढून त्याऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी सोनेरी पाटी लावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर येऊन आठ दिवस उलटले तरी अजून राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये खाते वाटपावरून अद्यापही घोळ कायम आहे.
काही खात्यांवरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांनी शपथ घेऊन आठ दिवस उलटलेत. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानं काँग्रेसला एक चांगलं खातं हवं आहे. दरम्यान, सध्या सगळ्याच खात्यांचा कारभार मुख्यमंत्री स्वतः पाहत आहेत.